Maharashtra Politics: शिंदेंची मोठी खेळी! स्वतःच्या नेत्यांऐवजी सचिन अहिर यांनाच उमेदवारी देण्यामागचे काय आहे रणनीती?
Why Eknath Shinde chose Sachin Ahir : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार मुंबईच्या राजकारणातील एक प्रभावशाली मानले जाणारे नेते सचिन अहिर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. शिंदे गटात सामील झाल्यानंतर लगेचच, अहिर यांनी महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी महायुतीचे उमेदवार म्हणून आपला अर्ज दाखल केला. ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
सचिन अहिर यांचे शिंदे गटात जाणे ही महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड मानली जात आहे. याचे कारण अहिर हे आदित्य ठाकरे यांच्या सर्वात विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक मानले जात होते. अलीकडेच, ठाकरे गटाचे नऊपैकी सहा खासदार शिंदे गटात सामील झाले होते. आता, अहिर यांच्या पक्षांतरामुळे उद्धव ठाकरे यांच्या संघटनात्मक ताकदीवर आणि रणनीतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, येत्या काही दिवसांत उद्धव गटातील आणखी अनेक आमदार पक्ष सोडून जाऊ शकतात, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
सचिन अहिर हे केवळ शिवसेनेचे (यूबीटी) ज्येष्ठ नेतेच नव्हते, तर मुंबईतील, विशेषतः वरळी भागातील आदित्य ठाकरे यांच्या राजकारणातील एक प्रमुख रणनीतिकार म्हणूनही ओळखले जात होते. जेव्हा आदित्य ठाकरे यांनी २०१९ मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली, तेव्हा वरळीची संपूर्ण निवडणूक जबाबदारी अहिर यांच्याकडे देण्यात आली होती. त्यावेळी अहिर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता.
राजकीय विश्लेषकांच्या मते, अहिर यांच्या जाण्यामुळे वरळीतील आदित्य ठाकरे यांच्या राजकीय कारकीर्दीवरही परिणाम होऊ शकतो. पण शिंदे गटाकडे इतके ताकदीचे उमेदवार असतानाही त्यांनी सचिन अहिर यांनाच उमेदवारी का दिली, असा सवालही उपस्थित होत आहे.
महायुती आघाडीमध्ये विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी नीलम गोऱ्हे आणि कृपाल तुमाने यांच्या नावांवर चर्चा सुरू होती. असे असूनही, एकनाथ शिंदे यांनी आपल्याच पक्षाच्या नेत्यांना मागे टाकून सचिन अहिर यांना उमेदवारी दिली. शिंदे यांचे हे एक मोठे राजकीय पाऊल मानले जात आहे.
अहिर यांना महत्त्वाचे पद देऊन शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना एक महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे, तसेच मुंबईतील आपले राजकीय स्थान आणखी मजबूत करण्याचा प्रयत्नही केला आहे. अहिर यांचा राजकीय प्रवास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, ठाकरे गटापर्यंत आणि आता शिंदे यांच्या शिवसेनेपर्यंत पसरलेला आहे.
नीलम गोऱ्हे या अखंड शिवसेनेत असताना २४ जून २०१९ ते एप्रिल २०२६ या कालावधीत विधान परिषदेच्या उपसभापती म्हणून कार्यरत होत्या. विधान परिषदेवर पुन्हा संधी मिळावी आणि उपसभापतिपदाची जबाबदारी पुन्हा आपल्या वाट्याला यावी, अशी त्यांची इच्छा असल्याची चर्चा होती. पक्षातील ज्येष्ठ आमदार म्हणून त्यांची ही अपेक्षा स्वाभाविक मानली जात होती.
मात्र, सातारा जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी उपसभापती असताना दिले होते. त्यावेळी हा निर्णय पक्षश्रेष्ठींना खूश करण्यासाठी घेतल्याची चर्चा झाली होती. या प्रकरणावरून मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, “विधान परिषदेच्या उपसभापतींचा शब्द म्हणजे ब्रह्मवाक्य नाही,” असे स्पष्ट करत दोशी यांच्यावरील कारवाई टाळली होती. काही दिवसांनी मात्र त्यांची बदली करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणामुळे भाजपमध्ये नाराजी निर्माण झाल्याची चर्चा होती.
याशिवाय, विधान परिषदेच्या निवृत्त सदस्यांच्या निरोप समारंभात नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेचीही मोठी चर्चा झाली होती. यापूर्वी त्यांनी ठाकरे यांच्याबाबत अशा प्रकारची भूमिका कधीच घेतली नव्हती. त्यामुळे त्यांच्या भाषणाकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष वेधले गेले होते. दरम्यान, सचिन अहिर यांना उपसभापतिपदासाठी उमेदवारी मिळाल्यानंतर नीलम गोऱ्हे यांच्या अपेक्षांना धक्का बसल्याची चर्चा सुरू असली, तरी त्यांनी या चर्चांचे खंडन केले आहे.






