कणकवली/ प्रगत लोके: विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कणकवलीत माहायुती आणि राणे कुटुंब अॅक्शन मोडवर काम करताना दिसून येत आहेत. अशातच आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीची भव्य प्रचारसभेचं आयोजन होणार आहे. यावेळी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची प्रमुख हजेरी असणार आहे, असं जाहीर करण्यात आलं आहे. कणकवली विधानसभा महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ व निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय सचिव विनोद तावडे कोकण दौऱ्यावर दि .१२ नोव्हेंबर रोजी येत आहेत. कणकवली विधानसभेतील निवडणुकीचा आढावा राष्ट्रीय सचिव विनोद तावडे,माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे,जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,आ.नितेश राणे यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती भाजपा विधानसभा अध्यक्ष मनोज रावराणे यांनी दिली.
हेही वाचा-“उद्धव ठाकरे यांनी केवळ मुख्यमंत्री होण्यासाठी…. “; रावसाहेब दानवेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम,कणकवली तालुका मंडल अध्यक्ष दिलीप तळेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे १२ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता कणकवली प्रहार भवन येथे कणकवली तालुका आढावा बैठक होणार आहे.दुपारी ३ वाजता फणसगाव येथे डॉ.सर्वेश नारकर यांच्या घरी बैठक होणार आहे.त्यानंतर वैभववाडी भाजपा कार्यालयात तालुक्याची आढावा बैठक ५ वाजता होणार आहे. या बैठकीला सर्व महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे,असे मनोज रावराणे यांनी सांगितले.
हेही वाचा- “राणेंच्या कार्यकर्त्यांकडून निविदासाठी ठेकेदारांना धमक्या” ;परशुराम उपरकरांचा आरोप
कणकवली विधानसभा आमदार नितेश राणे यांचा सर्वात मोठा विजय होणार आहे. तशी तयारी भारतीय जनता पार्टी कडून सुरु आहे.भविष्यात आ.नितेश राणे यांच्या विरोधात विरोधी पक्षाचा उमेदवार उभा राहताना विचार करेल, एवढा मोठा विजय नितेश राणेंचा असेल असा विश्वास मनोज रावराणे यांनी व्यक्त केला.
सध्या कणकवली आणि सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजप आणि ठाकरे गट यांच्यात चुरशीची लढत दिसत आहे. याचं कारण म्हणजे नितेश राणे आणि परशुराम उपरकर यांचे एकमेकांवर होणारे आरोप प्रत्यारोेप. उपरकर यांनी काही दिवसांपूर्वीच राणेंवर टीका केली होती. उपरकर म्हणाले की, दापोली ची सभा आणि चिपळूणच्या सावंतांना मारहाण झाल्यानंतर निलेश राणेंची जी बोलण्याची पद्धत आहे, त्यावर निलेश राणे यांनी आवर घातलेला असला तरी, येणाऱ्या २३ नोव्हेंबर ला निलेश राणे पडल्यानंतर सोबतच्या कार्यकर्त्यांना हवं ते बोलतील. निलेश राणे शांत झाले तरी लोक त्यांना निवडून देणार नाही. लोकांना राणेंची दहशत आणि राणेंच्या दोन्ही मुलांची दहशत लोकांच्या स्मरणात आहे. दापोलीच्या सभेत महिलांबद्दल जे काय बोललात किंवा एखाद्याला कशा पद्धतीने शिव्या घालता हे सर्वांनी बघितलेलं आहे. त्यामुळे निलेश राणे या २० दिवसासाठी जरी गप्प राहिले. तरी ते नंतर गप्प राहणार नाही ते त्यांच्या स्वभावाप्रमाणे वागणार आहेत. हे लोकांनी लक्षात ठेवावे.