धक्कादायक! महाकुंभात स्थान करणाऱ्या महिलांचे Video व्हायरल, डार्कवेबवर विक्री, महाराष्ट्र कनेक्शन उघड
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभमेळा सुरू आहे. लाखो भाविकांनी आतापर्यंत या कुंभमेळ्यात स्नान केलं असून अजून भाविक प्रयागराजमध्ये शाही स्नानासाठी दाखल होत आहेत. महिला, मुले, वृद्ध सर्वजण पवित्र स्नान करण्यासाठी महाकुंभात जात आहेत. मात्र काही ठिकाणी गैरकृत्य पहायला मिळाली आहेत. संगमावर स्नान करणाऱ्या महिलांचे व्हिडिओ पोस्ट केले जात आहेत. या व्हिडिओंची डार्कवेबवर विक्री केली जात असल्याची माहिती समोर आली असून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं आहे.
चंद्रप्रकाश, प्रज्ञेश आणि प्रणव तेली अशी त्यांची नावं आहे. महाकुंभात महिला स्नान करतानाच्या व्हिडिओबाबत पोलिस आता अॅक्शन मोडवर आले आहेत आणि तपास सुरू केला आहे. डार्क वेबवर व्हिडिओ विक्री प्रकरणाचा तपास प्रयागराजपासून गुजरात आणि महाराष्ट्रापर्यंत पोहोचला आहे.
तपासादरम्यान, महाराष्ट्रातील लातूर येथील प्रणव तेली आणि सांगली येथील तरुणाचं नाव समोर आलं आहे. गुजरात पोलिसांनी दोघांनाही अटक केली. आरोपी चंद्रप्रकाश फूलचंद मोंडा याच्या चॅनलवर कुंभमेळ्याचे व्हिडिओ आढळले. त्याने सीसीटीव्ही चॅनल ११ च्या नावाने टेलिग्रामवर एक अकाउंट तयार केले आणि व्हिडिओ अपलोड करून पैसे कमवले आहेत.
या प्रकरणात, गुजरात पोलिसांच्या तपासात असे दिसून आले आहे की लातूर जिल्ह्यातील प्रणव तेली नावाचा आरोपी परदेशी हॅकर्सच्या संपर्कात होता. आरोपी रुमानिया आणि अटलांटा येथील हॅकर्सशी संबंध असल्याचे आढळून आले. तो प्रयागराजमधील मॉल आणि रुग्णालयांचे व्हिडिओ बनवत असे आणि ते डार्क वेबवर विक्री करत होता. लातूरच्या या आरोपीसोबत महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील एका तरुणाची भूमिकाही समोर आली आहे.
या सर्वांनी टेलिग्रामवर वेगवेगळी अकाउंट तयार केली आणि काही टेलिग्राम अकाउंटचे सदस्यत्व २ हजार ते ४ हजार रुपयांमध्ये देऊन या व्हिडिओंमधून पैसे कमवले. प्रयागराजमधील कुंभमेळ्यात महिलांनी स्नान केल्याचे व्हिडिओ परदेशी हॅकर्सनी बनवले आणि डार्क वेबवर पोस्ट केले. याशिवाय त्यांनी गुजरात आणि महाराष्ट्रातील रुग्णालये आणि मॉलमधील महिलांचे व्हिडिओ बनवून पोस्ट केले.
लातूरमधून पैशांच्या व्यवहाराची लिंक सापडल्याची माहिती गुजरात पोलिसांना मिळाली असल्याचेही समोर आले आहे. लातूरमधील आरोपीच्या खात्यात परदेशातून पैसे आले आहेत. गुजरात आणि प्रयागराजमध्ये दोन एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत एकूण १३ एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. यासोबतच पोलीस कडक कारवाई करत आहेत. पोलिसांची सायबर टीम वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवून आहेत. यासोबतच आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या आणि अफवा पसरवणाऱ्यांवरही कारवाई केली जात आहे.