फोटो सौजन्य- pinterest
नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकरसंक्रांत. यंदा मकरसंक्रांत 14 जानेवारीला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. मकरसंक्रांतीमध्ये बोरन्हाण हे महाराष्ट्रात विविध नावाने प्रचलित आहे, तर विदर्भात त्याला लहान मुलांची लूट या नावाने प्रचलित आहे तर काही ठिकाणी बोरलूट असंही म्हणतात. ही परंपरा आजही साजरी करण्यात येते. बोरन्हाण म्हणजे काय, कधी साजरे केले जाते, काय आहे त्यामागे धार्मिक आणि सामाजिक कारणे जाणून घ्या
नववधूची पहिली मकरसंक्रांत असली की, तिला हलव्याचे दागिने घातले जातात. तसेच बोरन्हाणच्या सोहळ्यात लहान मुलांना हलव्याच्या दागिन्यांनी नटवलं जातं. त्याचं औक्षण करून त्याच्या डोक्यावरून बोर, ऊस, हरभरे, मुरमुरे, बत्तासे, हलवा, तिळाच्या रेवड्या आदी पदार्थ टाकले जातात. हे पदार्थ उपस्थित लहान मुलं लुटतात. यावेळी इतर लहान मुलांचा आनंद अवर्णनीय असतो. या विधीला बोरन्हाण असं म्हटलं जातं.
लहान मुलांचं बोरन्हाण का करायचे यामागे एक पौराणिक कथा आहे. अस म्हणतात की, करी नावाच्या राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये म्हणून हा विधी करण्यात येतो. हा विधी सर्वप्रथम करी राक्षसापासून बचावासाठी बाळ गोपाळ कृष्णावर करण्यात आला होता. तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली आहे. लहान मुलं हे कृष्णाचं रुप मानलं जातं. त्यामुळे करी राक्षसाची सावली आपल्या मुलावर पडू नये, म्हणून बोरन्हाण करण्याची परंपरा सुरू झाली.
बोरन्हाणमागे धर्मशास्त्राबरोबरच आरोग्यवर्धक कारणही आहे. मकरसंक्रांत ही ऋतू बदलाची चाहुल आहे. लहान मुलांना या बदलत्या ऋतुचा त्रास होऊ नये आणि या ऋतुमधील फळे त्यांनी खावीत म्हणून हा विधी केला जातो. मजा आणि मस्तीमध्ये जी लहान मुलं न खाणारी फळे ही या निमित्ताने खातात. त्यामुळे त्यांना त्यातील जीवनसत्त्वे मिळतात.
मकरसंक्रांत आली की, लहान मुलांना बोरन्हाण करण्याची परंपरा आहे. मकरसंक्रांतीच्या करीदिन हे बोरन्हाणासाठी योग्य दिवस मानला गेला आहे. पण तुम्ही रथ सप्तमीपर्यंत हा सोहळा कधीही करू शकता तर एक वर्षांच्या चिमुकल्यापासून पाच वर्षांच्या मुलांचं बोरन्हाण करतात. लहान मुलांचा कौतुक सोहळा आजकाल मोठ्या थाट्यामाट्यात केला जातो.
घरात तुम्ही ज्या ठिकाणी बोरन्हाण करणार आहात ती जागा स्वच्छ करुन तिथे पाट किंवा चौरंग ठेवा. बाळाला नवीन काळ्या रंगाचे कपडे घालून त्यांना हलव्याचे दागिने घाला आणि चौरंगावर बसवा. त्यानंतर चिमुकल्याच औक्षण करा. त्याच्या डोक्यावरून बोर, उसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा आणि कुरमुरे एकत्र करुन त्याचं बोरन्हाण करा आणि उपस्थितीत लहान मुलांना ते लुटण्यासाठी सांगा. बोरन्हाणमध्ये वापरण्यात येणारी फळं मुलं इतर वेळी खात नाहीत म्हणून बोरन्हाणच्या माध्यमातून ती फळं त्यांच्या पोटात जातात.
हल्ली वाढदिवस, बारशे व अन्य कोणतेही सोहळे भव्य दिव्य करण्यासाठी हल्ली पालक वाटेल ते करतात. काही जण हा सोहळा करण्यासाठी खास ऑडर करतात. त्यात विशेष लक्ष दिले पाहिजे. कारण बोरन्हाण करताना लहान मुलांना डोक्याला किंवा अंगाला लागू नये म्हणून काळजी आपण घेतली पाहिजे. यासाठी छान छोटीशी छत्री वापरु शकता. या बोरन्हाणंमध्ये तुम्ही चुरमुरे, लाह्या, छोटी बोरं, चिंचा, गाजराचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, रंगीबेरंगी गोळ्या, हल्लीच्या लहान मुलांच्या आवडीचा विचार करून वेगवेगळी चॉकलेट्स, गोळ्या, बिस्कीटे वापरु शकता.
यावेळी काही श्लोक येत असतील ते म्हटले तरी अति उत्तम, तसेच जमलेल्या आप्तेष्टांनी बाळावर प्रेमाचा, शुभेच्छांचा वर्षाव करावा. तो सुबत्तेत न्हाउ दे. कायम बाळगोपाळांनी घेरलेला म्हणजेच सर्वांचा लाडका होऊ दे, असा हा लहान मुलांचा मकरसंक्रांतीमधील एक संस्कार आहे. प्रत्येक लहान मुलांच्या घरी आवर्जून करावा.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: बोरन्हाण हा महाराष्ट्रातील एक पारंपरिक विधी आहे. मकरसंक्रांतीनंतर लहान मुलांना किंवा नवजात बाळांना बसवून त्यांच्या अंगावर बोर (बेर), ऊस, भुईमूग, तीळ, हरभरे, साखरगाठी अशा नैसर्गिक पदार्थांचा वर्षाव केला जातो. हा विधी आनंद, संरक्षण आणि आशीर्वादाचे प्रतीक मानला जातो.
Ans: मकरसंक्रांतीनंतर सूर्य उत्तरायणात प्रवेश करतो. या काळात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि आरोग्यास पोषक वातावरण तयार होते. त्यामुळे संक्रांतीनंतर बोरन्हाण करणे शुभ मानले जाते.
Ans: साधारणपणे नवजात बाळापासून 5–7 वर्षांपर्यंतच्या मुलांचं बोरन्हाण केलं जातं. विशेषतः पहिल्यांदा संक्रांती अनुभवणाऱ्या बाळासाठी हा विधी महत्त्वाचा मानला जातो.






