शादरीय नवरात्रीची आजची दुसरी माळ. आजचा रंग आहे तो लाल आणि हा लाल रंग आहे तो म्हणजे देवी दुर्गा मातेचा. या लाल रंगाला उग्र किंवा रौद्र म्हटलं जातं. मात्र फक्त एवढाच याचा अर्थ आहे का , चला तर मग जाणून घेऊयात या लाल रंगाचं नेमकं महत्व काय ?
हिंदू संस्कृतीत लाल रंग अत्यंत शुभ, ऊर्जादायी आणि शक्तीचं प्रतीक मानला जातो. हा रंग माता दुर्गेची शक्ती, विजय, पराक्रम आणि उत्साह दर्शवतो. लग्न, मंगलकार्य, पूजाअर्चा, नवरात्र यांसारख्या सणांमध्ये लाल रंगाला विशेष स्थान आहे. लाल रंग आनंद, समृद्धी, धैर्य आणि सकारात्मक उर्जा देतो असं मानलं जातं. नवरात्रीत माता दुर्गेच्या विविध रूपांची पूजा करताना लाल रंगाचे वस्त्र, फुले किंवा प्रसाद अर्पण करण्याची परंपरा आहे, कारण हा रंग शक्ती व प्रेम यांचं एकत्रित प्रतीक मानला जातो. दुर्गेप्रमाणेच देवी चंद्रघंटा हिला देखील लाल रंगाचे वस्त्र परिधान केले जातात. या देवीचं वैशिष्ट्य म्हणजे कपाळावर अर्धचंद्राच्या आकाराची घंटा आहे, म्हणून तिला “चंद्रघंटा” असं नाव मिळालं आहे. देवीचं स्वरूप अत्यंत तेजस्वी, पराक्रमी आणि युद्धासाठी सदैव तयार असं मानलं जातं.
लाल किंवा गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान करणं शुभ मानलं जातं. हा रंग देवीची पराक्रमी शक्ती, साहस आणि आनंद यांचं प्रतीक आहे. लाल रंग हा भक्तांच्या मनातील भीती दूर करून आत्मविश्वास वाढवतो आणि जीवनात सकारात्मकता आणते, असा विश्वास आहे. खरं तर लाल रंग पाहिला कि रक्ताचा रंग म्हणून अनेकदा त्याला नकारार्थी घेतला जातो. मात्र या रंगाचा साकारात्मक अर्थ असा कि अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात जेव्हा जेव्हा रौद्ररुप घेतलं जातं तेव्हा त्या क्रोधाचा रंग लाल असतो. याचबरोबर प्रेमाचा आणि सौंदर्याचा रंग म्हणून देखील या लाल रंगाकडे पाहिलं जातं. लाल रंग प्रेम, उत्कटता आणि सौैंदर्याचा कारक आहे त्याचप्रमाणे तो न्यायासाठी रौद्र अवतार घेणाऱ्या दुर्गेचा देखील आहे. ज्या मासिकपाळीला विटाळ मानलं जातं त्याच मासिक पाळीमुळे एक जीव जन्माला येतो. त्यामुळे या रंगाला देखील महत्व जास्त आहे.