हिंदू धर्मात कुलदेवतेला असो किंवा कोणत्याही देवीच्या दर्शनाला जाताना भाविक मोठ्या श्रद्धेने देवीची ओटी भरतात. देवी असो किंवा सुवासिनी खणा नारळाने तिची ओटी भरली जाते. ही प्रथा नक्की का सुरु झाली आणि या विधीचा नेमका अर्थ काय चला जाणून घेऊयात.
देवीची ओटी भरणे ही फार पुर्वापार चालत आलेली प्राचीन परंपरा आहे, जी विशेषतः नवरात्री, पौर्णिमा, व्रतपूर्ती, जत्रा किंवा देवीच्या उत्सवांमध्ये केली जाते. ओटी म्हणजे विवाहित स्त्रीला दिली जाणारी पारंपरिक भेट. देवी ही आदिशक्ती, आई आणि सौभाग्याचे प्रतीक मानली जाते. त्यामुळे देवीची ओटी भरणे म्हणजे तिला सौभाग्यवती स्त्रीप्रमाणे सन्मान देणे होय.
ओटीमध्ये हळद, कुंकू, नारळ, पान, सुपारी, फुले, धान्य, फळे, साडीचा तुकडा अशा शुभ वस्तू ठेवतात. या प्रत्येक वस्तूचे आपले धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व असते. हळद-कुंकू हे मंगलकार्याचे, तर नारळ हे समृद्धीचे प्रतीक आहे. पान-सुपारी हे आनंद आणि दीर्घायुष्य दर्शवतात. ओटी भरून देवीसमोर अर्पण केल्याने घरात लक्ष्मीचे आगमन होते, सुख-शांती नांदते आणि कुटुंबावर संकटे येत नाहीत, अशी हिंदु धर्मात मान्यता आहे.
ही प्रथा विशेषतः विवाहित स्त्रिया पाळतात. त्या देवीची ओटी भरून पतीचे दीर्घायुष्य, कौटुंबिक आनंद, अपत्यसुख आणि समृद्ध जीवनाची प्रार्थना करतात. तसेच, व्रत किंवा नवस पूर्ण झाल्यावर देवीचे आभार मानण्यासाठीही ओटी भरली जाते. हे कृत्य स्त्रीशक्ती, मातृत्व आणि कृतज्ञतेचे प्रतीक मानले जाते.
धार्मिक कारणांव्यतिरिक्त याला सामाजिक महत्त्वही आहे. ओटी भरण्याच्या कार्यक्रमामुळे महिलांना एकत्र येण्याची, परस्परांशी संवाद साधण्याची आणि आनंद साजरा करण्याची संधी मिळते. त्यामुळे समाजातील एकोपा वाढतो आणि पारंपरिक संस्कार पुढच्या पिढीकडे पोहोचतात.अशा प्रकारे देवीची ओटी भरणे हे फक्त धार्मिक विधी नसून सौभाग्य, समृद्धी आणि मातृशक्तीच्या पूजनाचा सुंदर संगम आहे. ही परंपरा घरात आनंद, शांती आणि देवीचे आशीर्वाद आणते, असा श्रद्धेचा विश्वास आजही कायम आहे.
मातृत्वाचा सन्मान – देवीला आदिशक्ती मानले जाते. तिची ओटी भरणे म्हणजे तिला सौभाग्यवती स्त्री म्हणून मान देणे. तसेच तिच्या आईचा केलेला सन्मान असतो असं म्हटलं जातं. स्त्री ही अनंत कालाची माता आहे. त्यामुळे देवी असो किंवा सुवासिनी यांची ओटी भरणं शुभ शकून मानला जातो.
समृद्धीची कामना – हळद, कुंकू, नारळ, धान्य हे संपत्ती, आरोग्य आणि समाधानाचं प्रतीक आहे. यामुळे घरात लक्ष्मीचे आगमन होते असा विश्वास आहे.
सौभाग्य वृद्धी – विवाहित स्त्रिया देवीची ओटी भरून पतीचे दीर्घायुष्य, कौटुंबिक आनंद आणि अपत्यसुख यासाठी प्रार्थना करतात.
कृतज्ञता व्यक्त करणे – व्रत, नवस किंवा संकल्प पूर्ण झाल्यानंतर देवीचे आभार मानण्यासाठी ओटी भरली जाते.
हळद-कुंकू – सौभाग्याचे प्रतीक
पान-सुपारी – आदर शुभ शकून
नारळ – समृद्धीचं चिन्ह.
तांदूळ – भरभराटीचे प्रतीक.
फुले – शुद्धता आणि भक्तीचे चिन्ह.
फळे/मिठाई – प्रसन्नता आणि गोडवा वाढवण्यासाठी.
खण – देवीच्या सौभाग्याचा सन्मान
देवीला सुती कापड, नारळ आणि इतर सौभाग्याचं साहित्य ओटीमध्ये अर्पण केलं जातं. ओटी भरण्याचा अर्थ हाच असतो की, तिच्या मांगल्याचं तत्व हे आपल्या अंगी यावं. ज्या प्रमाणे देवी आपल्या भक्तांचं रक्षण करते तेच सत्व कुटुंब सांभाळताना प्रत्येक स्त्रीच्या अंगी यावं असा एक अर्थ सांगितला जातो.