श्रावण म्हणजे व्रत वैकल्यांचा सण म्हणून त्याची हिंदू धर्मात ओळख आहे. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी महादेवांची मनोभावे पूजा शिवभक्त करतात. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी महादेवांच्या पिंडीवर बेलपत्र अर्पण केलं जातं. त्याचबरोबर श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी शिवभक्त महादेवांना शिवामूठ अर्पण करतात. हीच शिवामूठ म्हणजे काय आणि श्रावणातच ती का वाहिली जाते हे जाणून घेऊयात.
शिवामूठ म्हणजे नैवेद्याच्या स्वरूपात महादेवाला अर्पण करण्यात येणाऱ्या धान्यांची मुठ, त्याला शिवामूठ असं म्हणतात.
श्रावण महिन्यात विशेषतः सोमवारच्या दिवशी भगवान शंकराला अर्पण करतात. श्रावण महिन्यात महादेवाची विशेष पूजा केली जाते कारण हा महिना शिवभक्तीचा महिना मानला जातो. या महिन्यात भगवान शिव कैलासावर वास्तव्याला आलेले असतात, असे मानले जाते. म्हणून भक्त शिवामूठ वाहून त्यांचं स्वागत करतात. श्रावण महिना हा भगवान शंकरांना अत्यंत प्रिय आहे त्यामुळे शिवभक्त श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी भगवान महादेवांची आराधना करतात. शिवामूठमध्ये सहसा पाच किंवा सात धान्यांचा समावेश असतो. हे धान्य पंचतत्त्वांचे प्रतीक मानले जाते. पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश ही तत्त्वे संतुलित राहावी. तसंच संपूर्ण सृष्टीचे पालनहार हे ब्रम्ह विष्णू आणि महादेव आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून शिवामूठ अर्पण केली जाते.
श्रावण महिन्यातच पावसाळा असतो आणि शेतकऱ्यांनी नुकतीच पेरणी केलेली असते. शेतीची भरभराट व्हावी आणि पिक चांगल यावं अशा भावनेने भक्त शिवामूठ वाहतात. प्रत्येक धान्याचे विशिष्ट गुणधर्म असतात. उदा. मूग हे शुद्धतेचं प्रतीक मानलं जातं, उडीद हे बलवर्धक मानलं जातं. त्यामुळे ही अर्पण विधी आरोग्य आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी उपयुक्त ठरते. निसर्ग आपल्याला कायमच भरभरुन देत असतो. पृथ्वीवरील सर्वच सजीवांच्या निरोगी आरोग्यासाठी निसर्ग कायमच जे उत्तम आहे ते देण्याचं काम करतो. त्यामुळे त्याला धन्यवाद देण्यासाठी म्हणून शिवामूठ वाहण्यात येते. निसर्गाप्रति कृतज्ञ असणं असा त्याचा अर्थ होतो. शिवामूठ म्हणजे अहंकाराचा त्याग, समर्पण, कृतज्ञता, आणि शुद्ध भावनेने परमेश्वराला केलेलं समर्पण आहे. असं अध्यात्म सांगतं. हिंदू धर्मानुसार श्रावणात पृथ्वीवर महदेवांचं वास्तव्य असतं. त्यामुळे महादेवांना शिवामूठ अर्पण करणं अधिक प्रभावी ठरतं. महादेवांची आराधना केल्याने भक्तांना सकारात्मक ऊर्जा आणि व आंतरिक शांतता लाभते.