फोटो सौजन्य - Social Media
द्वारका श्रीकृष्णाने स्वतः निर्माण केलेली आणि आपल्या दिव्य नेतृत्वाने समृद्ध केलेली नगरी! ही नगरी फक्त समुद्रकिनारी असलेले सुंदर राज्य नव्हते, तर ती भक्ती, बुद्धी, संस्कृती आणि व्यापार यांचा संगम होती. अनेकांना वाटते की भगवान श्रीकृष्ण स्वतः द्वारकेचे राजा होते, परंतु हे पूर्णतः चुकीचे आहे. ते द्वारकेचे अधिपती, मार्गदर्शक आणि रक्षक होते, पण औपचारिकरीत्या त्यांनी कधीच “राजा” ही पदवी स्वीकारली नाही.
कृष्णाच्या जीवनातील हे वैशिष्ट्य अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांनी राज्यसत्ता न स्वीकारता नेतृत्व केले आणि सर्वांचा विश्वास जिंकला. कंसाचा वध करून त्यांनी मथुरेला भयातून मुक्त केले आणि त्यानंतर कंसाचे वडील म्हणजेच स्वतःचे आजोबा उग्रसेन यांना पुन्हा राज्याभिषेक करून मथुरेच्या गादीवर बसवले. परंतु जरासंधाच्या सततच्या आक्रमणांमुळे मथुरेतील यादव लोक भयभीत झाले. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने समुद्रदेवाला प्रसन्न करून समुद्र मागे सारला आणि त्या जागेवर द्वारका नगरीची स्थापना केली.
ही नगरी केवळ सुरक्षिततेसाठी नव्हे, तर नव्या सुरुवातीसाठी उभारण्यात आली होती. जरी संस्थापक श्रीकृष्ण होते, तरी त्यांनी पुन्हा एकदा राजपद आपल्या आजोबांनाच दिले. राजा उग्रसेन हे अधिकृत शासक झाले, तर कृष्ण हे राज्याचे प्रत्यक्ष नेते व रक्षक बनले. सर्व प्रशासनिक निर्णय, धोरणे आणि राज्यातील कार्य श्रीकृष्णाच्याच सूचनेने पार पडत. त्यांच्या बुद्धिमत्तेने आणि दूरदृष्टीने द्वारका व्यापार, संस्कृती आणि समुद्री संबंधांच्या दृष्टीने समृद्ध झाली.
म्हणूनच श्रीकृष्णाला “द्वारकाधीश” म्हणजे द्वारकेचा अधिपती ही उपाधी मिळाली, पण ती राजेपदाची नव्हे, तर आध्यात्मिक व नेतृत्वाच्या भावनेची ओळख होती. त्यांनी सत्ता न मागता, सेवा केली; गादी न घेताही जग जिंकले.