भारताच्या ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day) दिल्लीत कर्तव्यपथावरील पथसंचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होता. महाराष्ट्राचा (Maharashtra) चित्ररथ महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती या संकल्पनेवर (Maharashtra Tableau 2023) आधारीत होता. या चित्ररथाला देशभरातून दुसऱ्या क्रमाकांचे पारितोषिक मिळाले आहे. उत्तराखंड राज्याने पहिला तर उत्तर प्रदेशने तिसरा क्रमांक पटकावला आहे.
महाराष्ट्राने यापूर्वी ४० वेळा राजधानी दिल्लीत मुख्य पथसंचलनात चित्ररथ सादर केलेला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त यावेळी ‘साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती’ ही संकल्पना सादर करण्यात आली होती. महाराष्ट्र ही संत आणि देवदेवतांची भूमी आहे. महाराष्ट्राला मोठी धार्मिक परंपरा आहे. कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुकामाता हे तीन पूर्ण शक्तीपीठे आहेत. तर वणीची सप्तश्रृंगी हे अर्धे शक्तिपीठ आहे. या शक्तिपीठांचे दर्शन दिल्लीतील पथसंलनात सर्वांना घेता आले होते.
महाराष्ट्राच्या चित्ररथाच्या पुढच्या दर्शनीय भागात गोंधळी संबळ वाद्य वाजवित असल्याची प्रतिकृती होती. समोरच्या डाव्या व उजव्या भागास पारंपरिक वाद्य वाजविणारे आराधी, गोंधळी यांच्या प्रतिमा होत्या. त्यामागे साडेतीन शक्तिपीठांची मंदिरे आणि त्यात देवींच्या प्रतिमा असं दाखवण्यात आलं होतं. मागच्या बाजूस पोतराज आणि हलगी वाजविणाऱ्या भक्तांची प्रतिकृती होती. मधल्या जागेत आराधी, पोतराज हे लोककला सादर करत होते. तर शेवटी मागच्या बाजूस नारी शक्तीचे प्रतिनिधीत्व करणारी एक मोठी स्त्रीप्रतिमा लावण्यात आली होती.
या चित्ररथाची संकल्पना सांस्कृतिक कार्य संचालनालयाची होती. ‘शुभ ॲड’ या संस्थेने चित्ररथाला मूर्त स्वरुप देण्याचे काम केले. संगीतकार कौशल इनामदार यांनी चित्ररथासाठी साडेतीन शक्तीपीठांचा महिमा सांगणारे गीत संगीतबद्ध केले. तर प्राची गडकरी यांनी हे गीत लिहिले. ‘व्हिजनरी परफॉर्मिंग कला समूह’ या संस्थेच्या कलाकारांनी या चित्ररथावर नृत्य कला सादर केली. यवतमाळ जिल्ह्यातील पाटणबोरी येथील यशवंत एनगुटीवार या शिल्पकाराने यातील प्रतिमा साकारल्या. यशवंत यांना पिढीजात मूर्ती कलेचा वारसा लाभला आहे. महाराष्ट्र नव्हे तर देशाबाहेर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅलिफोर्निया, दुबई तसेच श्रीलंका येथे त्यांनी विविध शिल्प साकारून पाठवली आहेत.