स्वराज्याची मुहुर्तमेढ रोवली ती राजमाता जिजाऊ आऊसाहेबांनी ते स्वराज्य निर्माण केलं ते छत्रपती शिवरायांनी आणि हे स्वराज्य शेवटच्या श्वासापर्यंत पेललं ते छत्रपती संभाजी महाराजांनी. श्री शंभो: शिवजातस्य मुद्राद्यौरिव राजते। यदंकस्येविनी लेखा वर्तते कस्यनोपरि।। छत्रपतींच्या सिंहासनावर विराजमान झाल्यानंतर शंभूराजेंनी केवळ स्वत:ची वेगळी राजमुद्राच बनवली नाही तर स्वराज्याच्या विस्तारासाठी रक्ताचं पाणी देखील केलं याला इतिहास साक्ष आहे. खरंतर भोसले घराणं म्हणजे त्याग, शौर्य आणि पराक्रमाचं दुसरं नाव असं म्हटलं तर ते वावग ठरणार नाही. शौर्य आणि साहज गाजवण्यात भोसले कुळाच्या तिनही पिढ्यांचा इतिहास अभिमानास्पद आहे. शिवाजी महाराजांसारखे असामान्य पिता लाभल्यावर केवळ पुस्तकी शिक्षणच शंभूराजेंना कसं मिळणार होतं?
राज्याच्या राजकारणासाठी केवळ लिहिता वाचता येणंच नाही तर युद्धकलेचं तंत्रशुद्ध शिक्षण शंभूराजेंना मिळाल ते विद्वान केशव पंडित यांच्या देखरेखीखाली. युवराजपदावर असतानाच शंभूराजेंनी ‘बुधभूषण’ ग्रंथ लिहिला. या ग्रंथात निष्ठावान सैनिक कसा असतो, सैनिकाची कर्तव्य, शौर्य आणि साहस म्हणजे काय, या सगळ्याबाबत महाराजांनी त्यांना ग्रथांत नमूद केले. विशेष म्हणजे हा ग्रंथ स्वराज्याच्या या धाकल्या धन्याने वयाच्या केवळ 14 वर्षी लिहिला. शंभूराजेंच्या शौर्याबाबात सांगताना फ्रेंच प्रवासी अॅबे कॅरे याने नमूद केलं की, शिवरायांनी शंभूराजेंना वयाच्या 14 ते 15 वर्षी राज्यकारभाराचे धडे देण्यास सुरुवात केली होती. युद्धासाठी फक्त शक्तीच नाही तर युक्ती देखील तितकीच महत्वाची असते. शंभूराजे 15 वर्षांचे असताना शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्याचे विभाग करुन शत्रूवर हल्ला चढवला होता. त्यावेळी दहा हजार सैन्याचा एक विभाग त्यांनी युवराज शंभूराजेंच्या ताब्यात दिला. युवराज वयाने लहान असले तरी त्यांचं शौर्य, त्यांचं साहस हे वीराप्रमाणेच होतं. कसलेल्या सेनापतीशी बरोबरी करेन इतकं इतकं प्रावीण्य त्यांनी लहान वयातंच युद्ध कलेत मिळवलं होतं.
शौर्य साहस रयतेवरचं अपार प्रेम आणि धर्मनिष्ठा या शंभूराजेंच्या गुणांमुळे सैन्यातीस हरएक मावळा त्यांना पाहून प्रभावित होत असे. मात्र या सगळ्याबरोबर आणखी एक महत्त्वाचा भाग होता ते म्हणजे या वीरपुत्राचं तेजस्वी सौंदर्य. स्वराज्यातील फक्त मावळेच नाही तर प्रत्येक सर्वसामान्य कुटुंब हे शंभूराजेंवर पोटच्या मुलासारखं प्रेम करत होते. शंभूराजेंवर मावळ्यांची इतकी अपार निष्ठा होती की, त्यांना राजांच्या आज्ञेखाली परकीय आक्रमणांशी लढण्यात सैन्याला धन्यता वाटत असे. वीरता आणि त्यागाचं मुर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. शत्रूशी लढताना पोलादासारखा कणखर असणारा हा योद्धा बापाच्या मायेच्या छायेत मात्र लोण्यासारखा विरघळत असे. जन्माला आल्यापासून शंभूराजेंना संघर्ष पाचवीला पुजला होता. वयाच्या दुसऱ्या वर्षीचं जन्मदात्या माऊलीचं छत्र हरपलं, अनेक मोहीमा,मनसुबे यात शिवाजीराजेंना शंभूराजेंसाठी फार वेळ देता आला नाही तरी या बाप लेकाचं नातं सह्याद्रीसारखं अढळं होतं. अंतर असलं तरी ते एकमेकांना कधीच दुरावले नव्हते. शंभूराजेंचं वर्णन करताना फ्रेंच प्रवासी अॅबे कॅरे याने नमूद केले आहे.
सदर लेख हा नवराष्ट्रच्या स्वराज्याचा छावा या मासिकावर आधारित आहे.