Children's Day 2025 : जगात २० नोव्हेंबरला पण भारतातच १४ नोव्हेंबरला साजरा केला जातो बालदिन; काय आहे कारण? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
भारत १४ नोव्हेंबरला बालदिन साजरा करतो कारण हा दिवस पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन असून त्यांचे मुलांवर अपार प्रेम होते.
जगभरात २० नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय बालदिन साजरा केला जातो, कारण त्या दिवशी यूएनने ‘बालहक्क जाहीरनामा’ स्वीकारला होता.
बालदिनाचा मुख्य उद्देश मुलांच्या हक्कांबाबत जागरूकता वाढवणे, शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणे आणि बालकल्याणाच्या समस्यांवर चर्चा घडवून आणणे हा आहे.
Children’s Day 2025 : दरवर्षी १४ नोव्हेंबरला भारतभरात आनंद, उत्साह आणि हास्याने भरलेला बालदिन (Children’s Day) साजरा केला जातो. शाळांमधील सांस्कृतिक कार्यक्रम, मुलांसाठी विशेष उपक्रम आणि शिक्षणासोबत मजा हा दिवस सर्वच मुलांसाठी खास बनवतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की जग २० नोव्हेंबरला बालदिन साजरा करत असताना भारत मात्र १४ नोव्हेंबरलाच का करतो? ही तारीख केवळ निवडलेली नाही, तर तिच्यामागे एक इतिहास, एक भावना आणि एका महान नेत्याचे मुलांवर असलेले निस्सीम प्रेम दडलं आहे.
१४ नोव्हेंबर हा दिवस भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन. नेहरूंना मुलांवर अफाट प्रेम होतं. ते म्हणत असत,
“आजची मुले म्हणजे उद्याचा देश.” त्यांच्या दृष्टीने मूल म्हणजे एक कोरी पाटी नव्हती, तर भविष्यातील एक सक्षम नागरिक. ते मुलांना वेळ देत, त्यांच्यासोबत खेळत, त्यांच्या प्रश्नांना महत्त्व देत. मुलांच्या डोळ्यांतील उत्साह त्यांना प्रेरणा देत होता. मुलांवरील या अपार प्रेमामुळेच त्यांनी देशभरात शिक्षण, बालकल्याण आणि युवा विकासावर मोठ्या प्रमाणात भर दिला. त्यांच्या प्रेमामुळेच मुले त्यांना “चाचा नेहरू” म्हणून ओळखू लागली. नेहरूंनंतर देशाने त्यांना श्रद्धांजली म्हणून त्यांच्या जन्मदिवशी बालदिन साजरा करण्याचा निर्णय घेतला जो आजही परंपरेने चालू आहे.
हे देखील वाचा : सोशल मीडिया राहिले नाही जीवनाचे मोल; अभिनेते धर्मेंद्रच्या बाबत फिरवली अफवा
जगभरात २० नोव्हेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय बालदिन म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी १९५४ मध्ये हा दिवस मुलांच्या हक्कांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी निश्चित केला. या दिवशीच १९५९ मध्ये “बालहक्क जाहीरनामा” स्वीकारण्यात आला आणि पुढे १९८९ मध्ये “बालहक्क करारनामा” मान्य करण्यात आला. त्यामुळे हा दिवस जागतिक पातळीवर बालसंरक्षण आणि बालकल्याणाच्या चर्चांसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो. भारतही २० नोव्हेंबर रोजी विविध सरकारी आणि सामाजिक उपक्रमांत सहभागी होतो. मात्र, मुलांचा मुख्य उत्सव कार्यक्रम, सांस्कृतिक साजरेपण १४ नोव्हेंबरलाच पार पडते.
बालदिन हा केवळ मजा, खेळ आणि शाळेतील कार्यक्रमांचा दिवस नाही. ह्या दिवसाची मुळ भावना खूप मोठी आहे.
शिक्षण, आरोग्य, सुरक्षितता, समान संधी ही प्रत्येक मुलाची मूलभूत हक्क आहेत. बालदिन समाजाला याची आठवण करून देतो की मुलांचे संरक्षण आणि प्रगती हीच देशाची खरी प्रगती आहे.
चाचा नेहरूंचे स्वप्न होते की प्रत्येक मुलाला शिक्षण मिळावे, कोणतेही मूल शिक्षणाच्या अभावामुळे मागे राहू नये. हा दिवस त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा देतो.
हे देखील वाचा : महाराष्ट्रात श्वास घेणे अवघड! ‘या’ जिल्ह्यांत प्रदूषणाचे संकट गंभीर; धूलिकणांची पातळी….
शाळांमधील चित्रकला, भाषण, निबंध, नृत्य, खेळ या स्पर्धा मुलांची लपलेली क्षमता बाहेर आणतात. या क्रियाकलापांमुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो.
बालकामगार, कुपोषण, बालविवाह, अत्याचार या समस्या समाजासाठी आजही आव्हान आहेत. बालदिन या समस्यांवर उपाय शोधण्याची उत्तम संधी ठरते. बालदिन हा फक्त एक उत्सव नसून तो मुलांच्या उज्ज्वल भविष्याची, त्यांच्या सुरक्षिततेची आणि त्यांच्या विकासाची हमी देणारा दिवस आहे. १४ नोव्हेंबर हा दिवस नेहरूंच्या प्रेमाची आठवण तर करून देतोच, पण देशाला हेही सांगतो की प्रत्येक मूल हा देशाचा उजेड आहे.






