International Day Against Drug Abuse 2025: 'हा' दिवस साजरा करण्याचे उद्दिष्ट म्हणजे ड्रग्जविरुद्ध महत्त्वाकांक्षी युद्धाचे आवाहन ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
International Day Against Drug Abuse 2025 : २६ जून हा ‘आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ गैरवापर व अवैध तस्करी विरोधी दिन’ म्हणून जगभर साजरा केला जातो. या दिवसाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे अंमली पदार्थांच्या वापराबाबत जनजागृती करणे, चुकीच्या माहितीचा प्रतिकार करणे आणि समाजाला पुराव्यावर आधारित प्रतिबंध, उपचार व पुनर्वसनाच्या पर्यायांबद्दल शिक्षित करणे होय.
सध्या ड्रग्ज आणि अल्कोहोलचा विळखा जगभरातील तरुणांपासून वृद्धांपर्यंत अनेक स्तरांवर गाठू लागला आहे. अंमली पदार्थांचे व्यसन ही केवळ वैयक्तिक नाही, तर सामाजिक, आर्थिक व राजकीय पातळीवरची गहन समस्या आहे. या संकटाचा सर्वाधिक फटका असुरक्षित आणि सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांना बसतो. व्यसनाधीन व्यक्ती मानसिक, शारीरिक व सामाजिक दृष्टिकोनातून अधःपतनाच्या वाटेवर जातात. त्यांना समाजातील कलंक, आरोग्याच्या समस्या आणि भेदभावाला सामोरे जावे लागते.
२०२५ सालची UNODC द्वारा निश्चित केलेली थीम “साखळ्या तोडणे : सर्वांसाठी प्रतिबंध, उपचार आणि पुनर्प्राप्ती!” – ही केवळ घोषवाक्य नाही, तर एक सामूहिक आवाहन आहे. या संदेशामधून स्पष्ट होते की अंमली पदार्थांविरोधात लढा देण्यासाठी आरोग्यसेवेची सहज उपलब्धता, समाजाचा सक्रिय सहभाग आणि जागतिक एकजूट आवश्यक आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘फक्त ‘या’ दोन गोष्टी केल्या तर…’ इराण अणुशक्ती बनण्यापासून दोन पावलं दूर, पेंटागॉनचा खळबळजनक अहवाल समोर
ड्रग्जचा वापर वाढण्यामागील एक महत्त्वाचा पैलू म्हणजे राजकारणाशी त्याचा असलेला जवळचा संबंध. अनेक देशांमध्ये ड्रग्ज माफियांना राजकीय छुपा पाठिंबा असल्याने या समस्येचे उच्चस्तरीय निराकरण होत नाही. भारतातही काही राज्यांत – विशेषतः पंजाबमध्ये – ड्रग्ज तस्करी मोठ्या प्रमाणावर होत आहे. गोल्डन क्रेसेंट अर्थात पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इराणच्या सीमेजवळ असल्याने पंजाब ही अंमली पदार्थांची सहज वाहतूक करणारी भूमी बनली आहे. पंजाबमधील तब्बल २६% तरुण अंमली पदार्थांच्या विळख्यात आहेत. ही एक सामाजिक आपत्तीच आहे.
या समस्येवर मात करण्यासाठी भारत सरकारने ‘नशा मुक्त भारत अभियान’ सुरू केले आहे. सीमांवर नियंत्रण, NCB च्या कारवाया, तसेच पुनर्वसन केंद्रांच्या माध्यमातून सरकार सक्रिय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विषयावर सातत्याने भाष्य करत जनजागृती केली आहे.
UN च्या अहवालानुसार, जगात दरवर्षी सुमारे ३० कोटी लोक अंमली पदार्थांचा वापर करतात आणि ३५ दशलक्ष लोकांना व्यसन विकाराने ग्रासले आहे. या पैकी फक्त १२.५% व्यक्तींना उपचार मिळतात, जे चिंताजनक आहे. शिवाय, ड्रग्ज व्यापारातून दरवर्षी ४०० अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक उत्पन्न मिळते, जे गुन्हेगारी आणि दहशतवादास चालना देणारे आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : हिंद महासागरात रचला जातोय मृत्यूचा सापळा? भारतासाठी सावधानतेचा इशारा, ‘या’ तीन देशांचे मिळून मोठे षडयंत्र
या महासंकटावर उपाय म्हणजे – आरोग्यकेंद्रित उपाययोजना, पुनर्वसन, शिक्षण, समाजात संवाद आणि स्थानिक पातळीवर सक्रियता. युवकांमध्ये जागरूकता वाढवणे, कुटुंबसंस्थेचे बळकटीकरण आणि तणाव व्यवस्थापन हेही अत्यावश्यक उपाय आहेत. आपण सर्वांनी मिळून ही ‘नशेच्या आहारी गेलेल्या जगाची साखळी’ तोडली पाहिजे. एक औषधमुक्त, आरोग्यदायी आणि सशक्त समाज निर्माण करण्यासाठी हीच वेळ आहे एकत्र येण्याची आणि कृती करण्याची.