आंतरराष्ट्रीय पुरुष दिन (फोटो- istockphoto)
आज आहे आंतरराष्ट्रीय पुरुष दिन
यावर्षी ‘सेलिब्रेटींग मेन अँड बॉईज’ ही असणार थीम
भावनिक दडपणामुळे पुरुषांमध्ये नैराश्याचे वाढते प्रमाण
सुनयना सोनवणे/ नवराष्ट्र: नुकताच सोशल मीडियावर स्टेशनवर एकटाच बसून रडणाऱ्या पुरुषाचा व्हिडिओ व्हायरल झाला. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ‘पुरुष रडत नाहीत’ ही समाजात खोलवर रूजलेली मानसिकता आजही किती घट्ट टिकून आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. पुरुषांनी भावना व्यक्त करू नयेत, वेदना दाखवू नयेत, आणि मानसिक ताण पचवून टाकावा हीच अपेक्षा त्यांच्यासाठी गंभीर मानसिक आरोग्याचा अडथळा ठरत आहे.
आज ‘आंतरराष्ट्रीय पुरुष दिन’ असून यावर्षीची थीम ‘सेलिब्रेटींग मेन अँड बॉईज’ अशी आहे. पुरुष आणि मुलांच्या भावनिक, शारीरिक आणि सामाजिक कल्याणाची जाणीव वाढवणे, तसेच त्यांच्या सकारात्मक भूमिकांचा गौरव करणे यावर या दिनानिमित्त भर देण्यात आला आहे. त्याचबरोबर पुरुषांसमोरील मानसिक व आरोग्यविषयक आव्हानांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
पुरुषांना लहानपणापासूनच भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा संस्कार दिला जातो. अगदी छोट्या मुलालाही रडल्यावर ‘मुलीसारखा रडू नकोस’ असे सांगितले जाते. भावना व्यक्त करणे म्हणजे कमजोरी असा गैरसमज मुलांच्या मनावर बिंबवला जातो. यामुळे मोठेपणी रडणे, भीती व्यक्त करणे, किंवा मन मोकळं करणं पुरुषांना कठीण, कधी कधी अपमानास्पदही वाटू लागते. यामुळे त्यांच्यातील मानसिक ताण, एकाकीपणा आणि नैराश्य हळूहळू वाढू लागते, असे मानसोपचारतज्ञ डॉ. रश्मी देशमुख सांगतात.
मानसिक आरोग्य सल्लागारांच्या मते कामाचा ताण, नात्यांमधील गुंतागुंत, आणि स्वतःच्या भावनांविषयी बोलता न येणे या सर्वांचा परिणाम पुरुषांच्या चिडचिडीपणा, ताण आणि आत्मविश्वासावर होतो. डॉ. नीरज जाधव यांच्या मते, ‘घराची जबाबदारी, आर्थिक स्थैर्य राखणे आणि प्रत्येक परिस्थितीत भावनात्मक स्थिरता दाखवणे या सगळ्या अपेक्षा पुरुषांवर ठेवून समाज त्यांना ‘सर्वकाही सांभाळायलाच हवं’ असा अवास्तव दबाव टाकतो. ही मानसिकता मोडली नाही तर मानसिक आजारांचे प्रमाण वाढत राहील.’
तज्ञांच्या मते भावनिक दडपणामुळे पुरुषांमध्ये नैराश्याचे प्रमाण वाढते आहे. आत्महत्यांचे आकडेही याची प्रचिती देतात. राष्ट्रीय गुन्हे नोंद पथकाच्या २०२३ च्या अहवालानुसार देशातील सर्वाधिक अशा एकूण २२,६८७ आत्महत्या महाराष्ट्रात नोंदल्या गेल्या. भारतातील सर्व आत्महत्यांमध्ये पुरुषांचे प्रमाण ७२.८%, तर महिलांचे २७.२% आहे. हेच चित्र राज्यातही दिसते. देशातील सर्वाधिक आत्महत्या असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर असून त्यानंतर तामिळनाडू, मध्यप्रदेश, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल यांचा क्रमांक लागतो. हे आकडे स्पष्टपणे सांगतात की पुरुष मानसिक ताण आणि सामाजिक दडपणामुळे अधिक धोक्यात आहेत. या बाबतीत काम करणारे महेश शिंदे यांनी सांगितले की घरगुती हिंसाचाराचेही अनेक पुरुष बळी पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुरुषांच्या बाजूने ठामपणे उभे राहण्याची गरज आहे.
आत्महत्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारने काही उपक्रम सुरू केले आहेत. राष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंधक धोरण (२०२२) चा उद्देश २०३० पर्यंत आत्महत्यांच्या प्रमाणात १०% घट करणे हा आहे. ‘टेली–मानस’ ही २४×७ मोफत मानसिक आरोग्य सल्ला देणारी सेवा उपलब्ध आहे. तसेच राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत मानसिक आरोग्यसेवा सर्वपर्यंत सहज पोहोचाव्यात यावर भर दिला जातो.
पुण्यातील ‘कनेक्टिंग ट्रस्ट’ ही संस्था गेल्या २० वर्षांपासून तणावग्रस्तांसाठी समुपदेशन सेवा पुरवते. संस्थेचे सल्लागार वीरेन राजपूत म्हणाले, ‘आमच्याकडे एकूण मिळणाऱ्या फोनपैकी जवळपास ७६% फोन पुरुषांचे असतात. अनेक तरुण करिअर, नातेसंबंध, आर्थिक अडचणी अशा कारणांमुळे तीव्र तणावाखाली असतात. व्यक्त होता न आल्याने त्यांच्यात चिंता, निद्रानाश, निर्णयक्षमता कमी होणे आणि पुढे व्यसनाधीनता किंवा आत्महत्येचा कल वाढतो.’
मोकळेपणाने बोलता न आल्यामुळे वाढलेल्या तणावाचे व्यसनात रूपांतर होत असल्याचेही तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. डॉ. हमीद दाभोळकर सांगतात, ‘व्यसन हीदेखील मानसिक आजाराची गंभीर पायरी आहे. समाजातील ‘पुरुषत्व’ या चुकीच्या संकल्पना पुरुषांना व्यसनाकडे ढकलतात. खरा पुरुषार्थ हा व्यसनाला नकार देण्यात आणि भावना स्वीकारत पुढे जाण्यात आहे.’
आंतरराष्ट्रीय पुरुष दिनानिमित्त तज्ज्ञांनी पुरुषांच्या मानसिक आरोग्याकडे संवेदनशीलतेने पाहण्याचे आवाहन केले आहे. समाजाने ‘परफेक्ट मॅन’च्या अवास्तव कल्पना बदलून वास्तववादी अपेक्षा ठेवणे, संवादाला वाव देणे आणि भावनिक अभिव्यक्तीस प्रोत्साहन देणे या गोष्टी पुरुषांच्या मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.






