पुण्यातील कस्तुरे चौक मित्र मंडळाने 22 फुटी उंच मूर्ती साकारली आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
Ganeshotsav 2025 : प्रिती माने : पुण्यातील गणेशोत्सव हा पारंपरिक मानला जातो. ढोल ताशाचा नाद आणि पालखीतील विराजमान बाप्पा असे वैशिष्ट्य असते. तर मुंबईचा गणेशोत्सव हा भव्य दिव्य मानला जातो. भल्या उंच गणरायाच्या मूर्ती आणि त्याची डोळे दिपवणारी भव्यता ही मुंबईच्या गणेशोत्सवाची खासियत आहे. पण दोन्हीची सांगड घातली आहे रविवार पेठेतील कस्तुरे चौक मित्र मंडळाने.
मुंबईतील गणेशोत्सव पाहण्यासाठी प्रत्येकाला तिथे जाणे शक्य नसते. हीच बाब लक्षात घेत पुणेकरांना देखील भव्य गणरायाच्या मूर्तीचा अनुभवता घेता यावा असे या मंडळाने ठरवले. आणि मुंबईच्या धर्तीवर पुण्यामध्ये देखील 20 फुटांहून अधिक उंच गणरायाची प्रतिमा साकारण्यास सुरुवात केली. डोळ्याचे पारणे फेडणारे ही मूर्ती आणि मनाला प्रफुल्लित करणारे त्या मूर्तीवरील भाव हे पुणेकरांना जणू आशिर्वाद देत आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुण्यातील कस्तुरे चौक मित्र मंडळाने तब्बल 22 फूट उंच आणि आधांतरित अशी गणरायाची मूर्ती साकारली आहे. तसे हे मंडळ जूने असून यंदाचे मंडळाचे गणेशोत्सव साजरा करण्याचे106 वे वर्षे आहे. मागील दोन वर्षांपासून मंडळाकडून पुण्यातील सर्वात उंच मूर्ती साकारण्यात येत आहे. यंदाची मूर्ती देखील तितकीच सुंदर आणि लोभसवाणी आहे. मुषकराजवर विराजमान असा हा बाप्पा आहे. गणपती बाप्पाचा एक केवळ एकच पाय उंदरावर आहे. तर दुसरा तरंगता आहे. याचबरोबर चार उंदाराची पुढे स्वारी असून याचे दोर गणरायाच्या हातामध्ये आहेत.
गणरायाची मूर्ती ही चलमूर्ती
पुण्यातील सर्वात उंच अशी ही मूर्ती तयार करण्यासाठी मुंबईतील मूर्तीकार राजू शिंदे अथक प्रयत्न करतात. लालबाग परळ येथील राजू शिंदे तब्बल 15 दिवस ही मूर्ती बनवण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेत असतात. संपूर्ण पीओपीमध्ये घडवण्यात आलेल्या ही मूर्ती समतोल राखलेली आहे. गणरायाची मूर्ती ही चलमूर्ती असून लक्ष्मी रोडच्या विसर्जन मिरवणूकीमध्ये देखील सहभागी होते. यामुळे मूर्ती घडवताना पूर्ण काळजी घेतली जाते. यासाठी इंजिनियर्सकडून अभिप्राय घेत त्याप्रमाणे मूर्ती घडवली जाते.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मुंबईप्रमाणे मूर्ती घडवण्यात आली असली तरी तिचे विर्जसन करणे हा देखील प्रश्न मनामध्ये निर्माण होतो. कारण पुण्यामध्ये केवळ कृत्रिम हौदामध्ये विसर्जन केले जाते. पण मंडळाने यावर जबाबदारीने मार्ग काढला आहे. विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्यानंतर मूर्तीकार राजू शिंदे हे मूर्ती मुंबईमध्ये घेऊन जातात. यानंतर मुंबईमध्ये विधीवत पूजा करुन विसर्जन केले जाते. यासंदर्भात मंडळाने मूर्तीकारांसोबत करार देखील केला आहे. त्यामुळे 22 फुटी मूर्तीचे विसर्जन हे मुंबईतील समुद्रामध्ये केले जाते.
कस्तुरे चौक मित्र मंडळाकडून अनेक समाजपयोगी उपक्रम देखील घेतले जातात. यामध्ये गणेशोत्सव काळामध्ये भव्य रक्तदान शिबीर राबवले जाते. त्याप्रमाणेच निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी सीड-बॉल अर्थात बीजगोळेचे वाटप करण्यात येते. त्याचप्रमाणे वारी काळामध्ये देखील हजारो वारकऱ्यांची सेवा केली जाते. वारकऱ्यांच्या राहण्यासाठी आणि जेवणाची सोय मंडळातर्फे केली जाते.