फोटो सौजन्य: Pinterest
5 डिसेंबर 1956 ची सकाळ डॉ. आंबेडकरांसाठी नेहमीसारखीच होती. त्या दिवशी ते थोडे उशिराने उठले. 16 वर्षांपासून त्यांच्या सोबत असणारे नानक चंद रत्तू यांनी बाबासाहेबांकडून कार्यालयात जाण्यासाठी परवानगी घेतली. रत्तू गेल्यानंतर, दिल्ली येथील निवासस्थानी डॉ. आंबेडकर, त्यांची पत्नी सविताबाई आणि डॉ. मालवणकर होते.
डॉ. मालवणकर मुंबईहून दिल्ली येथे आंबेडकरांच्या हेल्थ चेकअपचा आढावा घेण्यासाठी आले होते. दुपारच्या सुमारास, डॉ. मालवणकर आणि सविताबाई काही सामान खरेदी करण्यासाठी बाजारात गेले. संध्याकाळी 6 वाजता रत्तू डॉ. आंबेडकरांना भेटले. मात्र, अजूनही सविताबाई घरी आल्या नव्हत्या. त्यामुळे आंबेडकरांना असे वाटत होते की आपली काळजी योग्य पद्धतीने घेतली जात नाही आहे. त्यांच्या मनातील हा दुवा रत्तू यांना देखील जाणवला. पुढे आंबडेकरांनी रत्तू यांना टायपिंगची काही कामे दिली.
पुढे थोड्या उशिरानेच, सविताबाई घरी पोहोचल्या तेव्हा आंबेडकर त्यांच्यावर भडकले आणि काही कठोर वाक्य त्यांना सुनावले. यावेळी काहीही बोलणे म्हणजे आगीत तेल ओतण्यासारखे आहे असा विचार करून सविताबाई यांनी निमुटपणे सगळं ऐकून घेतलं.
रात्री 8 च्या सुमारास जैन समाजाचे प्रतिनिधी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भेटीसाठी पोहोचले. डॉ. आंबेडकर यांची तब्येत चांगली नाही हे त्यांना स्वतःला ठाऊक होते. म्हणूनच ते जैन समाजातील प्रतिनिधींची भेट पुढे ढकलावी असा विचार करीत होते. मात्र, जैन नेते त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्याने त्यांनी भेट घेण्याचे ठरवले. जैन प्रतिनिध आणि आंबेडकरांमध्ये जैन आणि बौद्ध धर्मावर चर्चा झाली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्याचे ऐतिहासिक टप्पे, मुलांसाठी प्रेरणादायी इतिहास
जैन प्रतिनिधींच्या भेटीनंतर आंबेडकरांनी रत्तू यांना डोक्यावर तेल लावण्यास सांगितले. आता त्यांची तब्येत थोडी चांगली वाटत होती. त्यांनी बुद्ध वंदना म्हणजेच बुद्धम् शरणम् गच्छामि गाण्यास सुरुवात केली. जेव्हा कधीही ते आनंदी असत तेव्हा ते बुद्ध वंदना गात. त्यांनी रत्तू यांना काही पुस्तक आणायला सांगितली. त्यात बुद्ध अँड हिज धम्मा नावाच्या पुस्तकाचा देखील समावेश होता. यावेळी डॉ. आंबेडकरांनी बुद्ध अँड हिज धम्मा पुस्तकाच्या परिचयावर काम केले.
जेवण झाल्यानंतर आंबेडकर चल कबीर तेरा भवसागर हे कबिराचे दोहे गात होते. बुद्ध अँड हिज धम्मा या पुस्तकाच्या भूमिकेवर त्यांनी काम केले आणि त्याच पुस्तकावर हात ठेवून ते शांतपणे झोपी गेले.
6 डिसेंबर 1956 ची सकाळ उजाडली. नेहमीप्रमाणे सविताबाई सकाळी सहा वाजता डॉ. आंबेडकरांना उठवण्यासाठी आल्या. आंबेडकर पलंगावर शांतपणे झोपले होते. त्यांचे पाय उशीवर होते. त्यांनी दोन तीनदा त्यांना हाक दिली मात्र काहीच प्रतिसाद आला नाही. महामानव झोपेतच या भारत देशाला ‘जागे’ करून निघून गेले होते!






