(फोटो सौजन्य: iStock)
आकाश ढुमेपाटील : परत एकदा माणुसकीला मान खाली घालायला लावणारी आणि काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे. नसरापूर मध्ये अवघ्या ४ वर्षांच्या एका चिमुकलीवर एका वयोवृद्ध नराधमाने पाशवी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही बातमी ऐकून प्रत्येकाच्या अंगावर काटा आल्याशिवाय आणि संतापाने रक्त सळसळल्याशिवाय राहणार नाही. पण, प्रश्न हा आहे की आपण फक्त हळहळ व्यक्त करून किंवा दोन दिवस सोशल मीडियावर संताप व्यक्त करून थांबणार आहोत का?
४ वर्षांची मुलगी… जिच्यासाठी जग म्हणजे फक्त तिचे घर, तिचे आई-वडील आणि खेळणी असतात. तिला कपट किंवा क्रौर्य म्हणजे काय हेही माहीत नसते. अशा निरागस जीवाला वासनेची शिकार बनवणे, हे केवळ एका नराधमाचे कृत्य नाही, तर ती समाजातील वाढत्या मानसिक विकृतीची धोक्याची घंटा आहे. आपण कितीही प्रगत झाल्याचा, चंद्रावर पोहोचल्याचा अभिमान बाळगत असलो, तरी जोवर आपल्या अंगणात खेळणाऱ्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, तोवर या प्रगतीला काहीही अर्थ नाही.
अशा घटना वारंवार घडू नयेत, यासाठी समाजाने आता काही कठोर पावले उचलण्याची आणि आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे :
१. ‘मला काय त्याचे?’ ही वृत्ती सोडा :
अनेकदा आपल्या आजूबाजूला काही संशयास्पद घडत असते, एखादी व्यक्ती लहान मुलांसोबत अयोग्य वर्तन करत असते; पण आपण ‘ते त्यांचे बघून घेतील’ म्हणून दुर्लक्ष करतो. हीच मूकसंमती गुन्हेगारांचे धाडस वाढवते. आजूबाजूच्या घडामोडींवर समाजाची ‘सामूहिक नजर’ (Community Policing) असणे अत्यंत आवश्यक आहे.
२. ओळखीच्या चेहऱ्यांमागचे मुखवटे ओळखा :
बहुतांश वेळा लहान मुलांवर होणारे अत्याचार हे पूर्णपणे अनोळखी व्यक्तींकडून न होता, परिचयाच्या किंवा जवळच्या व्यक्तींकडूनच होतात. त्यामुळे डोळे झाकून कोणावरही विश्वास ठेवण्याची चूक पालकांनी करू नये. मुले कोणाकडे जात आहेत, त्यांच्याशी कोण कसे वागत आहे, यावर करडी नजर हवी.
३. मुलांशी मोकळा संवाद आणि ‘बॅड टच’ची माहिती :
आपले मूल कितीही लहान असले तरी त्याला ‘तुझ्या शरीरावर कोणाचा हक्क आहे आणि कोणाचा नाही’ हे शिकवणे आता प्राथमिक गरज बनली आहे. ‘गुड टच’ आणि ‘बॅड टच’ याबद्दल मुलांशी त्यांच्या भाषेत, खेळातून संवाद साधा. मुले जर अचानक शांत झाली असतील किंवा घाबरत असतील, तर त्यामागील कारण प्रेमाने जाणून घ्या.
४. कायद्याचा त्वरित आणि कठोर धाक हवा :
अशा नराधमांना अटक झाल्यानंतर न्याय मिळण्यास होणारा विलंब समाजातील संताप कमी करतो आणि गुन्हेगारांचे मनोबल वाढवतो. पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत खटला फास्ट-ट्रॅक कोर्टात चालवून गुन्हेगाराला तातडीने आणि सर्वांसमोर अशी कठोर शिक्षा मिळायला हवी, की भविष्यात असा विचार जरी कोणाच्या मनात आला, तरी त्याच्या अंगाचा थरकाप उडाला पाहिजे.






