National Pollution Control Day 2025 : वाढता धोका आणि शाश्वत भविष्यासाठीची जबाबदारी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सुनयना सोनवणे : दरवर्षी २ डिसेंबरला पाळला जाणारा राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन हा केवळ भूतकाळातील दुर्घटनेचे स्मरण नाही, तर पर्यावरण संरक्षणासाठी तयार राहण्याचा गंभीर इशारा आहे. १९८४ मधील भोपाळ गॅस दुर्घटनेने देशाला निष्काळजीपणाची किंमत किती प्रचंड असते हे दाखवून दिले. हजारो जीव घेणाऱ्या त्या रात्रीने प्रदूषणाच्या भीषण परिणामांची जाणीव करून दिली. यंदाच्या ‘हरित भविष्यासाठी शाश्वत जीवन’ या थीमद्वारे पर्यावरणपूरक जीवनशैलीची गरज अधिक ठळकपणे मांडण्यात आली आहे.
वाढत्या प्रदूषणाचे भयावह चित्र
आज प्रदूषण हे जगातील सर्वात मोठे सार्वजनिक आरोग्य संकट आहे. जागतिक हवेच्या गुणवत्तेच्या अहवालानुसार भारत हा जगातील पाचवा सर्वाधिक प्रदूषित देश ठरला आहे, तर जल गुणवत्तेत आपला १२२ देशांत १२०वा क्रमांक लागतो. औद्योगिक धूर, वाहनांची वाढ, बांधकामांतून उडणारी धूळ, कचरा जाळणे आणि हवामान बदल या सर्व घटकांमुळे परिस्थिती अधिकच बिकट होत आहे.
महाराष्ट्रात पीएम २.५ आणि पीएम १० या सूक्ष्मकणांचे प्रमाण अनेक ठिकाणी आरोग्याला घातक पातळीवर पोहोचले आहे. या कणांची वाढ ही श्वसनाचे विकार, हृदयरोग, दमा आणि कर्करोगाच्या जोखमीत मोठी भर घालते. अभ्यासानुसार पीएम २.५ मध्ये थोडीशी वाढ झाली तरी श्वसनासंबंधित औषधांच्या विक्रीत ६–८% वाढ होते.
शहराचीही अवस्था प्रदूषणामुळे दिवसेंदिवस बिकट होत आहे.राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
पुण्यातील हवा गुणवत्ता : गंभीर स्थिती!
पुण्यातील मागील काही दिवसांची हवा गुणवत्ता स्थितीही गंभीरच आहे. निगडी (१६१), कात्रज डेअरी (१७३), गवळीनगर (१९७), वाकड (२२१) आणि शिवाजीनगर (२६८) या क्षेत्रांमध्ये हवा ‘खराब’ ते ‘अत्यंत खराब’ श्रेणीत नोंदली गेली. विशेष म्हणजे भोसरी येथे हवा गुणवत्ता निर्देशांक तब्बल ४२७.३९ इतका — ‘गंभीर’ पातळीवर पोहोचला. ही स्थिती दीर्घकाळ राहिल्यास शहरातील नागरिकांचे फुफ्फुस स्वास्थ्य धोक्यात येण्याची शक्यता मोठी आहे.
पाण्याचे प्रदूषण : मुळा–मुठा नदी की नाला?
शहरातील हवा जशी विषारी होत आहे, तसाच मुळा–मुठा नदीपात्राचा होणारा ऱ्हासही चिंताजनक आहे. औद्योगिक सांडपाणी, घरगुती कचरा, प्लास्टिक आणि मलनिस्सारण मिसळल्याने नदीतील विरघळलेला ऑक्सिजन आरोग्यदायी पातळीखाली गेल्याचे आढळते. परिणामी, पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होऊन ग्रामीण आणि शहरी भागात जलजन्य आजारांची संख्या वाढत आहे.
मृदा प्रदूषण : अदृश्य पण अधिक धोकादायक
जगभरातील गंभीर समस्यांपैकी एक म्हणजे मृदा प्रदूषण. अधिक उत्पादनाच्या आशेने वापरल्या जाणाऱ्या रासायनिक खतांमुळे जमिनीची सुपीकता कमी होत आहे. जंगलतोड, कारखान्यांचा कचरा, हवामानबदल आणि नष्ट न होणारा घरगुती कचरा यामुळेही मातीची गुणवत्ता घसरत आहे. अशा जमिनीतून उत्पादित होणाऱ्या पिकांमध्ये रसायनांचे प्रमाण वाढून त्वचारोग, पचनविकार आणि कॅन्सरपर्यंतच्या आजारांचे धोके वाढतात. त्यामुळे सेंद्रिय शेतीचा प्रसार आणि रसायनमुक्त अन्नाची गरज आता अधिक महत्त्वाची झाली आहे.
ध्वनी प्रदूषण : शांततेवरचे आक्रमण
मानवनिर्मित ध्वनी प्रदूषण हा आधुनिक शहरांचा अविभाज्य भाग बनला आहे. वाहतूक, लाउडस्पीकर, मिरवणुका, फटाके, कारखान्यांची यंत्रणा या सर्वांमधून निर्माण होणारा कर्णकर्कश आवाज वृद्ध, लहान मुले आणि प्राण्यांसाठी विशेषतः धोकादायक ठरतो. तीव्र आवाजामुळे रक्तदाब, निद्रानाश, चिंता आणि ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.
गोखले पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स संस्था आणि शाश्व विकास केंद्राचे प्राध्यापक आणि संचालक डॉ. गुरुदास नुलकर यांनी म्हटले आहे की, प्रदूषण नियंत्रणाची जबाबदारी केवळ शासनाची नसून प्रत्येक नागरिकाचीही तितकीच आहे. बदलाची सुरुवात घरातून, स्वतःपासून व्हायला हवी. दैनंदिन जीवनात रसायनयुक्त वस्तूंचा वापर कमी करून पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारणे ही काळाची गरज आहे. समस्या निर्माण झाल्यावर तिच्यावर उपाययोजना करण्यापेक्षा ती निर्माण होऊच नये यासाठी आधीच जागरूक पावले उचलणे अधिक प्रभावी ठरते.






