Photo Credit- Social Media Pulwama Attack 2019 Solider Story : आई वाट बघत राहिली, पण वसंत कुमारांचा फोन आलाच नाही.....
Pulwama Attack 2019: 14 फेब्रुवारी… संपूर्ण जग जिथे व्हॅलेंटाईन डे साजरा करतं, तिथे भारतात हा दिवस ‘ब्लॅक डे’ म्हणून ओळखला जातो. 2019 मध्ये या दिवशी भारताने एक भयंकर वेदना सहन केली, जी कधीही विसरली जाऊ शकत नाही. जम्मू-कश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात आपल्या देशाचे 40 वीर जवान शहीद झाले. या घटनेला आता सहा वर्षे पूर्ण झाली असली तरीही, त्या शूरवीरांचा त्याग आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात जिवंत आहे.
14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू-कश्मीरमधील जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) चा मोठा ताफा श्रीनगरच्या दिशेने जात होता. अवंतीपोरा येथील गोरीपोरा भागाजवळ पोहोचताच, एका अज्ञात वाहनाने ताफ्यातील एका बसजवळ संशयास्पद हालचाल सुरू केली. सुरक्षा दलाने त्याला दूर राहण्याचे वारंवार आदेश दिले, परंतु वाहनाने ते आदेश धुडकावले. काही क्षणांतच, 200 किलो RDX ने भरलेल्या त्या वाहनाने बसला जोरदार धडक दिली आणि भीषण स्फोट झाला. या भयंकर हल्ल्यात 40 वीर जवान शहीद झाले. स्फोट इतका शक्तिशाली होता की त्याचा आवाज कित्येक किलोमीटर दूरपर्यंत ऐकू गेला. CRPFच्या ताफ्यात तब्बल 60 हून अधिक वाहने आणि 2,547 जवान होते, त्यामुळे हा हल्ला अत्यंत विध्वंसक ठरला.
CRPFच्या 118व्या बटालियनचे कॉन्स्टेबल महेश कुमार पुलवामा हल्ल्यात शहीद झाले. उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातील मेजा गावचे रहिवासी असलेले महेश काही दिवसांपूर्वीच सुट्टी संपवून पुन्हा ड्युटीवर परतले होते. मात्र, त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला, जेव्हा त्यांचे पार्थिव तिरंग्यात लपेटून गावी आणण्यात आले. गावभर शोककळा पसरली. 2011 मध्ये त्यांचा विवाह संजूसोबत झाला होता. त्यांच्या दोन मुलांचा पोटचा गोळा 7 वर्षीय समर आणि 6 वर्षीय समीर यांनी वडिलांना मुखाग्नी दिली.
शिक्रापुरात भीषण अपघात; भरधाव टँकर आडवा आल्याने कारचा चक्काचूर
CRPFच्या 76व्या बटालियनचे वीर जवान सुखजिंदर सिंह हे पंजाबच्या तरनतारन जिल्ह्यातील गंगीविंड गावचे रहिवासी होते. पुलवामा येथे त्यांची सात महिन्यांपूर्वीच बदली झाली होती आणि त्याच काळात त्यांना पदोन्नती मिळाली होती. त्यांच्या घरी एका गोंडस बाळाचा—गुरजोत सिंहचा जन्मही झाला होता. ते आपल्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसाला घरी जाण्याच्या तयारीत होते, मात्र नियतीला काही वेगळंच मान्य होतं. वाढदिवसाच्या आधीच तो आपल्या वडिलांना कायमचा मुकला.
CRPFच्या 82व्या बटालियनचे कॉन्स्टेबल वसंता कुमार वी.व्ही. केरळमधील वायनाड जिल्ह्यातील कुन्नाथीडावाका लक्कीडी गावचे होते. हल्ल्याच्या दिवशीच त्यांनी आपल्या आईशी फोनवर बोलून सांगितलं होतं की, ते नवीन पोस्टिंगसाठी पुलवामा जात आहेत आणि श्रीनगरमध्ये पोहोचल्यानंतर पुन्हा संपर्क साधतील. मात्र, हा फोन त्यांचा शेवटचा संवाद ठरला. रात्री उशिरापर्यंत फोन न आल्याने त्यांच्या आईने कार्यालयात चौकशी केली, तिथून तिला कळलं की तिचा मुलगा शहीद झाला आहे. हे ऐकताच त्या जागीच कोसळल्या.
देशभरात लोक शहीद जवानांसाठी शोक व्यक्त करत असताना, पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आणि जल्लोष साजरा केला. स्फोटानंतरचा परिसर इतका भयावह होता की संपूर्ण रस्ता रक्ताने माखलेला होता, जवानांचे मृतदेह तुकड्या-तुकड्यांमध्ये विखुरले होते. नंतर या वीरांचा सन्मानाने तिरंग्यात लपेटून अंत्यसंस्कार करण्यात आला.
पुलवामा हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून टाकले. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि भयंकर दहशतवादी हल्ला ठरला. या क्रूरतेने संपूर्ण भारताला एकत्र आणले आणि देशाने दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घेतली. या हल्ल्याला उत्तर म्हणून भारतीय हवाई दलाने (IAF) 26 फेब्रुवारी 2019 रोजी बालाकोट एअर स्ट्राईक करून जैश-ए-मोहम्मदच्या तळांना उध्वस्त केलं.
आजही, पुलवामाच्या त्या वीरांचा त्याग अजरामर आहे आणि त्यांची शौर्यगाथा प्रत्येक भारतीयाच्या मनात जिवंत आहे
या वीर जवानांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन देशाची सेवा केली. त्यांचा त्याग आणि शौर्य भारत कधीही विसरणार नाही. पुलवामा हल्ल्यातील प्रत्येक शहीदाच्या कुटुंबीयांसाठी संपूर्ण देश आजही कृतज्ञ आहे आणि कायम राहील.