World Vitiligo Day 2025 : रंगद्रव्याच्या नुकसानीमुळे त्वचेवर पांढरे डाग पडण्याच्या आजाराविषयी जागरूकता वाढवण्यासाठी दरवर्षी २५ जून रोजी ‘जागतिक त्वचारोग दिन’ (World Vitiligo Day) साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दिष्ट त्वचारोगाविषयी जनजागृती करणे, सामाजिक कलंक कमी करणे, तसेच या आजाराशी झुंजणाऱ्या रुग्णांना आत्मसन्मान आणि स्वीकृती देणे हे आहे.
त्वचारोग म्हणजे काय?
त्वचारोग, म्हणजेच विटिलिगो, हा एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये त्वचेमधील मेलेनिन या रंगद्रव्याच्या निर्मितीत अडथळा निर्माण होतो. यामुळे शरीराच्या विविध भागांवर पांढरे किंवा रंगहीन डाग निर्माण होतात. हा आजार कोणत्याही वयात, कोणत्याही लिंगाच्या आणि वांशिक पार्श्वभूमीच्या व्यक्तींना होऊ शकतो. विशेषतः १० ते ३० वयोगटातील तरुणांमध्ये याचा अधिक प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येतो. सामान्यतः हा आजार चेहरा, हात, पाय, गुप्तांग व सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येणाऱ्या भागांवर अधिक आढळतो. काही वेळा तो तोंड, डोळ्यांच्या आत आणि शरीराच्या कोणत्याही भागावर होऊ शकतो.
हे देखील वाचा : Israel-Iran Conflict: ‘आता सत्ताबदल हाच पुढचा टप्पा…’ डोनाल्ड ट्रम्पची ‘ही’ खरचं इराणला धमकी की फक्त खुर्ची वाचवण्यासाठी धडपड?
इतिहास आणि मायकेल जॅक्सन यांचा संदर्भ
जागतिक त्वचारोग दिनाची सुरुवात २०११ मध्ये झाली. या दिवसाच्या मागील प्रेरणा दिवंगत अमेरिकन पॉपस्टार मायकेल जॅक्सन होते. त्यांनाही त्वचारोग झाला होता. २५ जून २००९ रोजी त्यांचे निधन झाले होते, आणि त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी २५ जून हा दिवस ‘जागतिक त्वचारोग दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिवसासाठी जांभळा रंग हे प्रतीक म्हणून वापरण्यात येते, कारण तो त्वचारोगाची जाणीव करून देतो आणि रूग्णांच्या संघर्षाचे प्रतिनिधित्व करतो.
भारतीय परिप्रेक्ष्य
२०२२ मध्ये इंडियन जर्नल ऑफ क्लिनिकल अँड एक्सपेरिमेंटल डर्मेटोलॉजीने केलेल्या अभ्यासानुसार, संपूर्ण जगात त्वचारोगाचा सर्वाधिक प्रादुर्भाव भारतीय उपखंडात आहे. अंदाजे ८.८ टक्के लोकसंख्या या आजाराने प्रभावित आहे.
आयुर्वेदातील उपचार पद्धती
आयुर्वेदामध्ये त्वचारोगासाठी बाकुची (Psoralea corylifolia) या वनस्पतीचा वापर केला जातो. तिच्या बियांपासून बनवलेली औषधे त्वचेवर वापरली जातात. याशिवाय सोरालेन्स नावाचे द्रव्य स्थानिक आणि अंतर्गत वापरासाठीही उपयुक्त मानले जाते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Israel-US War : अमेरिका आणि इराणच्या युद्धात नेमकी काय आहे भारताची भूमिका? वाचा सविस्तर…
जागरूकतेसाठी उपक्रम
या दिवशी जागरूकता वाढवण्यासाठी विविध शिबिरे, चर्चासत्रे, सोशल मीडिया मोहीमा आणि समुदाय जागृती उपक्रम राबवले जातात. विटिलिगोबद्दल चुकीची माहिती, सामाजिक भेदभाव आणि मानसिक आघात दूर करण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञ, रुग्ण संघटना आणि स्वयंसेवी संस्था एकत्र येऊन काम करतात.
शरीरावरचे डाग हे सौंदर्याच्या मर्यादा नाहीत
जागतिक त्वचारोग दिन हा केवळ एक आरोग्यदिवस नाही, तर सामाजिक स्वीकृतीचा आणि आत्ममूल्याच्या पुनर्स्थापनेचा एक सशक्त प्रयत्न आहे. शरीरावरचे डाग हे सौंदर्याच्या मर्यादा नाहीत. हे समजून घेणे आणि समाजात परिवर्तन घडवणे, हेच या दिवसाचे खरे सार आहे.