International Albinism Awareness Day-2025 : भेदभावाविरोधात एकजुटीचा संदेश देणारा असा 'हा' खास दिवस ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
International Albinism Awareness Day 2025 : दरवर्षी १३ जून रोजी ‘आंतरराष्ट्रीय अल्बिनिझम जागरूकता दिन’ साजरा केला जातो. हा दिवस जगभरातील अल्बिनिझम असलेल्या व्यक्तींविषयी जागरूकता वाढवणे, त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि अधिकारांसाठी समर्थन व्यक्त करणे, तसेच त्यांच्या आजूबाजूला पसरलेल्या अंधश्रद्धा, भ्रामक कल्पना आणि भेदभाव नष्ट करण्यासाठी साजरा केला जातो.
अल्बिनिझम हा एक अनुवांशिक विकार आहे, ज्यामध्ये शरीरात मेलेनिन या रंगद्रव्याचे उत्पादन पूर्णपणे किंवा अंशतः थांबते. यामुळे व्यक्तीच्या त्वचा, केस आणि डोळ्यांचा रंग सामान्यांपेक्षा खूपच फिकट किंवा पांढरट दिसतो. हा विकार संसर्गजन्य नाही आणि तो जन्मजात असतो. मेलेनिनच्या कमतरतेमुळे अल्बिनिझम असलेल्या व्यक्तींच्या त्वचेवर उन्हामुळे सहज जळजळ होते, आणि त्यांना अनेक डोळ्यांचे त्रास भोगावे लागतात. उदा. नायस्टॅग्मस (डोळ्यांची अनैच्छिक हालचाल), फोटोफोबिया (तेज प्रकाशामुळे होणारी जळजळ), अंधुक दृष्टी आणि तिरळेपणा.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘City Killer’ लघुग्रह चंद्रावर विनाश घडवू शकतो; संभाव्य टक्कर शास्त्रज्ञांसाठी ठरणार ऐतिहासिक प्रयोग
१. ऑक्युलोक्युटेनियस अल्बिनिझम (OCA) – यामध्ये त्वचा, केस आणि डोळ्यांवर परिणाम होतो.
२. ऑक्युलर अल्बिनिझम (OA) – यामध्ये डोळ्यांवर परिणाम होतो, पण त्वचा आणि केसांचे रंग सामान्य असतात.
३. हर्मन्स्की-पुडलॅक सिंड्रोम आणि चेडियाक-हिगाशी सिंड्रोम – हे अल्बिनिझमसह इतर गंभीर आरोग्य समस्या असलेले दुर्मिळ प्रकार आहेत.
अल्बिनिझम ऑटोसोमल रिसेसिव्ह जनुक पॅटर्नमुळे होतो. म्हणजेच, जर दोन्ही पालक या विकाराचे वाहक असतील, तर त्यांच्या प्रत्येक गर्भधारणेत मुलाला अल्बिनिझम होण्याची शक्यता सुमारे २५% असते. हा विकार कोणत्याही वंश, धर्म किंवा प्रदेशातील व्यक्तींमध्ये आढळू शकतो.
२०१३ मध्ये संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेनं अल्बिनिझमविरोधातील हिंसाचार आणि भेदभावाविरोधात पहिला ठराव मंजूर केला. त्यानंतर १८ डिसेंबर २०१४ रोजी, संयुक्त राष्ट्र महासभेने १३ जून या दिवसाला ‘आंतरराष्ट्रीय अल्बिनिझम जागरूकता दिन’ म्हणून मान्यता दिली. यानंतर २०१५ मध्ये हा दिवस प्रथमच साजरा करण्यात आला.
या दिवसाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे –
1. अल्बिनिझमबाबत समाजात असलेल्या गैरसमजांना दूर करणे
2. या विकाराने प्रभावित झालेल्यांच्या सुरक्षिततेसाठी जागतिक स्तरावर समर्थन मिळवणे
3. आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि समान वागणुकीसाठी त्यांचे हक्क अधोरेखित करणे
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : स्पेनमध्ये अवकाशातून पडलेल्या धातूपासून बनवलेले 3,000 वर्ष जुने दागिने सापडले; ‘Villena Treasure’तून प्राचीन विज्ञानाचा अनोखा शोध
जगात अनेक देशांमध्ये, विशेषतः आफ्रिकन खंडात, अल्बिनिझम असलेल्या व्यक्तींवर सामाजिक बहिष्कार, छळ आणि हिंसाचाराचे प्रकार घडतात. काही ठिकाणी त्यांच्यावर जादूटोणाच्या नावाखाली अत्याचार होतात. त्यामुळे संयुक्त राष्ट्र आणि विविध मानवाधिकार संस्था अल्बिनिझमबाबत जागरूकता वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत.
अल्बिनिझम ही केवळ एक शारीरिक स्थिती आहे. तो कुठलाही दोष किंवा शाप नाही. या दिवशी आपण सगळ्यांनी मिळून अल्बिनिझम असलेल्या व्यक्तींना मानवतेच्या दृष्टिकोनातून बघण्याचा दृष्टिकोन विकसित केला पाहिजे. त्यांना समान संधी, सन्मान आणि सुरक्षित वातावरण देण्यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा, हीच या दिवसाची खरी प्रेरणा आहे.