भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महत्वाच्या घटना (फोटो- istockphoto)
पुणे/तेजस भागवत: ‘बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो’… असे आज प्रत्येक भारतीय नागरिक अभिमानाने म्हणत आहे. प्रत्येकजण आपल्याला हवे तसे, पाहिजे तसे संविधानाच्या चौकटीत राहून या देशात वावरत आहे. दरम्यान प्रत्येकजण स्वातंत्र्यांचा अनुभव घेत आहे. आज आपला भारत जगातील एक यशस्वी लोकशाही राष्ट्र आहे. ‘स्वधर्म’, ‘स्वराज्य’ आणि ‘स्वदेशी’ ही त्रिसूत्री भारताला स्वातंत्र्य मिळवताना करण्यात आलेल्या आंदोलनाची प्रेरणा होती. गुलामगिरीतून मुक्त होऊन आज आपल्याला ७९ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र आपल्याला हे स्वातंत्र्य सहजरित्या मिळालेले नाहीये. अनेक थोर स्वातंत्र्यसैनिकांनी यासाठी लढा दिला आहे.
खरेतर स्वातंत्र्यांचा लढा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातच सुरु झाला होता, असे म्हणायला हरकत नाही. मुघल, आदिलशाही, पोर्तुगीज अशा आक्रमणकारी शक्तींपासून आपला प्रदेश स्वत्रंत व्हावा यासाठी छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांनी सुरु केलेला हा लढा नंतर पेशव्यांनी पुढे नेला. मराठ्यांनी अटकेपार झेंडे रोवले. तेव्हापासून सुरु झालेला हा स्वातंत्र्याचा लढा अखेर १९४७ मध्ये पूर्ण झाला. ब्रिटिश राजवट उलथवून टाकण्यासाठी आणि भारत मातेला स्वतंत्र करण्यासाठी अनेक थोर स्वातंत्र्यसेनानींनी त्याग केला,मोठा लढा दिला आहे. आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे.
भारताला स्वतंत्र होऊन आज ७९ वर्षे पूर्ण झाली आहेत. भारत हा लोकशाहीवर विश्वास ठेवणारा आहे. मात्र विदेशी शक्तींनी भारतमातेवर केलेलं आक्रमण परतवून लावण्यासाठी तसेच परकीयांच्या गुलामगिरीचा नव्हे तर हिंदुस्थानावर स्वकीयांचा म्हणजे त्या देशातील नागरिकांचा हक्क आहे आणि तो मिळवण्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी खूप मोठा लढा दिला. लोकमान्य टिळक, मंगल पांडे, नेताजी सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा गांधी, राजगुरू, सुखदेव , भगतसिंग यांसह अनेक थोर स्वातंत्र्यसैनिकांनी भारताला स्वतंत्र करण्यासाठी लढा दिला. प्रसंगी अनेकांनी या भारतमातेच्या रक्षणासाठी, स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती दिली. आज आपण जे काही जगतोय, फिरतोय, आपल्याला हवे तसे वागतोय हे केवळ या थोर स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या त्यागामुळेच.
ब्रिटीशानी आपल्यावर सुमारे १५० वर्षे राज्य केले. मात्र भारतीयांनी ब्रिटिशांशी लढा देत स्वातंत्र्य प्राप्त केलेच. आपला हिंदुस्थान, आपली भारतमाता अखेर ब्रिटिशांच्या १५० वर्षांच्या गुलामगिरीतून १५ ऑगस्ट १९४७ रोजी मुक्त झाली. आपण स्वतंत्र झालो. मात्र या स्वातंत्र्यलढ्यात अशा अनेक महत्वाच्या घटना घडल्या, ज्या या देशाच्या इतिहासात कधीही न विसरता येण्यासारख्या आहेत. आज आपण या लेखाच्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्यलढ्यात घडलेल्या काही महत्वाच्या घटना जाणून घेणार आहोत. ज्यामुळे या लढ्याला बळ प्राप्त होत गेले, कलाटणी मिळत गेली आणि ब्रिटिश राजवटीवर आपला दबाव वाढत गेला.
१८५७ चा उठाव: १८५७ मध्ये झालेला हा स्वातंत्र्यसंग्राम देशाचे पहिले स्वातंत्र्ययुद्ध म्ह्णून ओळखले जाते. या उठावाला शिपाई बंड म्हणून देखील ओळखले जाते. या स्वातंत्र्यसंग्रामाची सुरुवात मेरठमधून झाली. या आंदोलनापासून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा लढा सुरु झाला. ब्रिटिशांनी भारतीयांवर लादलेले कर, आर्थिक धोरणे भारतीय जनता त्रस्त झाली होती. ब्रिटिशांच्या या धोरणांचा बिमोड करण्यासाठी १८५७ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध भारतीय सैनिकांनी शस्त्रे उचलली होती. मंगल पांडे यांच्या नेतृत्वात याचा उठावाची सुरुवात झाली.
चंपारण्य सत्याग्रह: महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात बिहारमध्ये हा चंपारण्य सत्याग्रह करण्यात आला होता. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सत्याग्रह करण्यात आला. तेथील शेतकऱ्यांना युरोपियन मळेवाल्यांकडून सक्तीची जमीन लागवड करण्यासाठी ‘तीनकाठिया’ ही अनिष्ठ प्रथा सुरु केली होती. त्या ठिकाणी शेततक्यांना योग्य मोबदला देखील मिळत नव्हता. तेथील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी यांनी त्या ठिकाणी सत्याग्रह केला. या सत्याग्रहाला यश आले. सरकारने ‘चंपारण्य कृषी कायदा’ केला आणि तेथील शेतकऱ्यांच्या समस्या दूर झाल्या.
जालियनवाला बाग हत्याकांड: १९१९ मध्ये ब्रिटिश सरकारने सार्वजानिक मेळाव्यांवर बंदीचा एक जुलुमी आदेश जारी केला होता. मात्र या आदेशाची माहिती नसल्याने हजारो भारतीय नागरिक बैसाखी सण साजरा करण्यासाठी अमृतसरमधील जालियनवाला बागेत जमले होते. या आदेशाचे पालन न केल्याने ब्रिगेडियर जनरल डायर यांनी लष्कराच्या मार्फत तेथे उपस्थित असणाऱ्यांवर बेछूट गोळीबार केला. कोणीही पळून जाऊ नये म्ह्णून बागेचे मुख्य द्वारे देखील त्याने बंद केले होते. यात शेकडो निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता.
असहकार चळवळ: महात्मा गांधी यांनी काँग्रेसची सूत्रे हातात घेतल्यानंतर १९२० च्या सुमारास असहकार चळवळ सुरू केली. यामध्ये भारतीय नागरिक ब्रिटिश वस्तू खरेदी करत नव्हते. भारतीय उत्पादनांना महत्व दिले जात होते. स्थानिक कामगार, कारागीर यांनी तयार केलेल्या वस्तू खरेदी करण्यावर भर दिला जात होता. महात्मा गांधी यांनी देशभर जाऊन नागरिकांना या चळवळीचे महत्व पटवून दिले. जालियनवाला बागेतील हत्याकांडानंतरच असहकार चळवळ सुरु झाली होती.
दांडी यात्रा: महात्मा गांधी यांनी काढलेला दांडी यात्रा ही भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्वाची घटना होती. ब्रिटिश सरकारने मिठावर कर लादला होता. या दडपशाहीचा विरोध करण्यासाठी महात्मा गांधी यांनी १९३० मध्ये साबरमती आश्रम ते दांडी समुद्रकिनाऱ्यापर्यंत यात्रा काढली होती. त्या ठिकाणी जाऊन त्यांनी ब्रिटिश सरकारच्या विरोधात आवाज उठवला होता.
नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे भारतात पुनरागमन, १९३५ चा भारत सरकार कायदा, भारत छोडो आंदोलन अशा अनेक महत्वाच्या घटना देशाला स्वातंत्र्य मिळवून देत असताना घडल्या आहेत. अनेक थोर स्वातंत्र्यसैनिकांनी संघर्ष केला आहे. लोकमान्य टिळकानी मंडाले तुरुंगात शिक्षा भोगली, तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी अंदमानच्या काळकोठडीत जन्मठेपेची शिक्षा भोगली. सुखदेव, भगतसिंग, राजगुरू यांनी भारतमातेसाठी आपल्या प्राणांची हसत-हसत आहुती दिली. भारताला स्वतंत्र करण्यासाठी लढा देणाऱ्या, संघर्ष करणाऱ्या, प्राणांची आहुती देणाऱ्या, घरदारवर तुळशीपत्र ठेवून राष्ट्रासाठी झटणाऱ्या सर्व स्वातंत्र्यसेनानींना वंदन केलेच पाहिजे. त्यांच्या शूर पराक्रमामुळे आज आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत, याची जाणीव आपल्याला कायम असलीच पाहिजे.