कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडोंनी दिला राजीनामा; पक्षाचे नेतेपदही सोडले (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ओटावा: कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी काल( दि.6 जानेवारी) आपल्या पदाचा राजीनामा दिला. यामुळे सध्या कॅडाच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरु आहे. याशिवाय त्यांनी आपल्या पक्षाचे नेतेपदही सोडले. राजीनामा देताना त्यांनी आपल्या देशाला उद्देशून केलेल्या भाषणात म्हटले की, पुढील निवडणुकीसाठी स्वतःला योग्य पर्याय ते मानत नाहीत. तसेच त्यांनी म्हटले की, “मी लढवय्या आहे, पण घरातील संघर्षात अडकून राहिलो तर मी कॅनडाच्या जनतेसाठी चांगले नेतृत्व करु शकणार नाही.” त्यांनी कॅनडा जनतेच्या कल्याणासाठी कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
ट्रूडो यांच्या राजीनाम्यामागची कारणे
लिबरल पक्षाच्या खासदारांनी अनेक महिन्यांपासून ट्रूडो यांच्यावर राजीनाम्याचा दबाव टाकला होता. पक्षातील 24 खासदारांनी ऑक्टोबरमध्ये जाहीरपणे त्यांना पद सोडण्याचे आवाहन केले होते. डिप्टी पंतप्रधान आणि वित्तमंत्री क्रिस्टिया फ्रीलँड यांनी डिसेंबरमध्ये राजीनामा दिल्यानंतर पक्षात असंतोष अधिक वाढला. फ्रीलँड यांनी ट्रूडो यांच्यावर निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये मतभेद असल्याचा आरोप केला होता. तसेच महागाई, कट्टरतावादी प्रवृत्तींचा प्रसार, अप्रवासी समस्या आणि कोविड-19 नंतरची आव्हाने यामुळे ट्रूडो यांच्यावर जनतेचा रोष वाढत होता. सध्या त्यांची लोकप्रियता 30% पर्यंत घसरली असून 65% नागरिकांनी असंतोष व्यक्त केला.
लिबरल पार्टीपुढील आव्हाने
ट्रूडो यांच्या राजीनाम्यानंतर लिबरल पक्षाकडे लोकप्रिय आणि प्रभावी नेतृत्व नसून, नवीन पक्षनेता निवडण्यासाठी विशेष अधिवेशन आयोजित करण्यात येईल. मात्र, या अधिवेशनाला काही महिने लागू शकतात. यामुळे पक्षाला नुकसान होण्याची शक्यता आहे. सध्या जस्टिन ट्रुडोंच्या जागी परराष्ट्र मंत्री मेलानी जोली, डोमिनिक लेब्लांक आणि मार्क कानी यांची नावे पुढे येत आहेत. हाऊस ऑफ कॉमन्समध्ये बहुमतासाठी 170 जागा लागतात, परंतु पक्षाकडे फक्त 153 खासदार आहेत. न्यू डेमोक्रॅटिक पार्टीने पाठिंबा काढून घेतल्याने लिबरल सरकार अस्थिर झाले आहे.
भविष्यातील राजकीय परिणाम
जस्टिन ट्रुडोंच्या राजीनाम्यामुळे, कंझर्व्हेटिव्ह पार्टीचे नेते पियरे पॉइलीवर यांना कॅनडाच्या आगामी निवडणुकांमध्ये मोठा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लिबरल पार्टीसाठी हा मोठा टप्पा ठरू शकतो, ज्यामध्ये पक्षाला आपले संघटन मजबूत करणे कठीण जाऊ शकते आणि जनतेचा विश्वास पुन्हा मिळण्यास प्रयत्न करावे लागतील.
जस्टिन ट्रुडोंचा राजीनामा हा कॅनडाच्या राजकीय परिस्थितीत सध्या एक मोठा बदल घडवून आणणार आहे. जस्टिन ट्रुडो यांच्या राजीनाम्यामुळे देशाच्या राजकारणात सध्या खळबळ उडाली आहे. लिबरल पार्टीला नव्या नेतृत्वाखाली आपले अस्तित्व टिकवण्यासाठी आणि कंझर्व्हेटिव्ह पक्षाला टक्कर देण्यासाठी प्रभावी रणनीती आखावी लागेल असे तज्ञांनी म्हटले आहे.