World Design Day 2025 : जागतिक डिझाईन दिन हा सर्जनशीलतेचा उत्सव म्हणून साजरा केला जातो, जाणून घ्या महत्त्व ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
World Design Day 2025 : दरवर्षीप्रमाणे यंदाही २७ एप्रिल २०२५ रोजी संपूर्ण जगभरात जागतिक डिझाईन दिन (World Design Day) साजरा करण्यात येणार आहे. डिझाइनच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवण्याच्या उद्देशाने हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. डिझाइनच्या महत्त्वपूर्ण भूमिकेला अधोरेखित करताना, सर्जनशीलता, नावीन्यपूर्णता आणि सौंदर्य यांचा उत्सव म्हणूनही या दिवसाकडे पाहिले जाते.
जागतिक डिझाईन दिनाची सुरुवात १९६३ साली इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ डिझाईन (ICO-D) या संस्थेने केली. जगभरातील डिझाइन व्यावसायिकांना एकत्र आणणाऱ्या या संस्थेने डिझाइनच्या सामर्थ्याला आणि त्याच्या सामाजिक, आर्थिक व पर्यावरणीय प्रभावाला जागतिक व्यासपीठावर स्थान दिले. यामागील प्रमुख उद्दिष्ट म्हणजे डिझाइनच्या माध्यमातून चांगल्या जगासाठी प्रेरणा देणे.
डिझाइन हा केवळ कलात्मकतेचा किंवा सौंदर्याचा विषय नसून, त्याचा समाजातील दैनंदिन जीवनावर आणि पर्यावरणावर मोठा परिणाम होतो. उत्कृष्ट डिझाइनमुळे उत्पादन आणि सेवा अधिक टिकाऊ आणि पर्यावरणपूरक बनतात. शिवाय, डिझाइनमध्ये समावेश, अॅक्सेसिबिलिटी आणि सामाजिक संवेदनशीलता यांना चालना दिली जाते. आजच्या काळात, जेव्हा हवामान बदल आणि सामाजिक असमानता यांसारख्या समस्यांशी जग झुंज देत आहे, तेव्हा डिझाइन हा परिवर्तनाचा प्रभावी साधन म्हणून पुढे येत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘रक्ताची शपथ आणि बलिदान…’ पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे पहलगामवर पहिलेच विधान
दरवर्षी जागतिक डिझाईन दिनासाठी एक विशेष थीम जाहीर केली जाते. २०२५ सालासाठी अद्याप थीमची घोषणा झालेली नाही, परंतु अपेक्षा आहे की ही थीम सामाजिक किंवा पर्यावरणीय आव्हानांवर प्रकाश टाकणारी असेल. ही थीम डिझायनर्सना त्यांच्या सर्जनशीलतेतून नवीन दिशा देण्याचे काम करेल.
या दिनाचे साजरे करण्याचे अनेक सर्जनशील मार्ग आहेत. शाळा, महाविद्यालये आणि विविध संस्थांमध्ये डिझाइन स्पर्धा, पोस्टर मेकिंग, वेबिनार आणि कार्यशाळांचे आयोजन केले जाऊ शकते. यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पकतेला वाव देण्याची संधी मिळते. पर्यावरणीय समस्या सोडवण्यासाठी नवीन उपाय शोधणारे प्रकल्पही डिझाइन करून सादर केले जाऊ शकतात. तसेच, स्थानिक कलाकार आणि डिझायनर्ससाठी विशेष प्रदर्शनाचे आयोजन करून त्यांची कला आणि कौशल्य व्यापक स्तरावर पोहोचवता येते. जागतिक डिझाईन दिन आपल्याला हे अधोरेखित करण्याची संधी देतो की, डिझाइन केवळ सौंदर्य निर्मितीसाठी नाही, तर ते समाजाच्या विकासासाठी एक शक्तिशाली साधन आहे. योग्य डिझाइनमुळे मानवी जीवन अधिक सोपे, सुरक्षित आणि आनंददायी होऊ शकते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘जंग करनी है तो…’ भारताच्या कृतीवर पाकिस्तानी लोकांचा स्वतःवरच ‘मीम अटॅक’, एकदा पहाच
२७ एप्रिल २०२५ रोजी, जागतिक डिझाईन दिनाच्या निमित्ताने, आपण सर्वांनी डिझाइनच्या सामाजिक शक्तीला ओळखून, नव्या विचारांना प्रोत्साहन देण्याचा संकल्प करूया. डिझाइनद्वारे जगाला अधिक समावेशक, शाश्वत आणि सुंदर बनवण्याचा हा एक प्रयत्न आहे.