World Rainforest Day 2025 : जगात नैसर्गिक सौंदर्याचे प्रतीक मानले जाणारे वर्षावन (Rainforests) आगामी शतकात इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहेत. जागतिक वर्षावन दिना निमित्त (World Rainforest Day) आज २२ जून रोजी संपूर्ण जगभरात वर्षावनांच्या संवर्धनासाठी जनजागृती केली जात असताना, तज्ज्ञांनी दिलेला इशारा अधिकच धोकादायक ठरत आहे. पुढील १०० वर्षांत आज अस्तित्वात असलेली बहुतेक वर्षावने पूर्णतः नष्ट होऊ शकतात.
आजच्या घडीला वर्षावनांचा नाश वेगाने होत असून, जगातील २५% पेक्षा जास्त लोकसंख्या म्हणजे सुमारे १.६ अब्ज लोक हे या नैसर्गिक संसाधनांवर आपल्या जीवनाच्या विविध गरजांसाठी अवलंबून आहेत. मात्र, जंगलतोड, प्रदूषण, शहरीकरण आणि हवामान बदल यामुळे वर्षावनांचे क्षेत्र झपाट्याने कमी होत आहे.
वर्षावनांचे महत्त्व काय?
वर्षावन हे पृथ्वीवरील जैवविविधतेचे भांडार मानले जाते. जगभरात आढळणाऱ्या वनस्पती आणि प्राण्यांच्या सर्वाधिक प्रजाती वर्षावनांमध्येच आढळतात. यातील बऱ्याच प्रजाती अत्यंत दुर्मिळ असून, अनेकांचे वैद्यकीय महत्त्व मोठे आहे. संशोधनानुसार, कर्करोगविरोधी औषधांपैकी ६०% औषधांचा मूळ स्रोत वर्षावनांतील वनस्पती आहेत. याशिवाय, वर्षावन हवामान संतुलनात महत्त्वाची भूमिका बजावतात. ही जंगले कार्बन डायऑक्साइड शोषून वातावरण स्वच्छ ठेवतात आणि मुसळधार पावसासाठी जबाबदार असतात. त्यामुळे वर्षावनांचा नाश म्हणजे पृथ्वीच्या पर्यावरणीय संतुलनाला मोठा धक्का.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Biological Weapon : अणुबॉम्बपेक्षा जास्त धोकादायक असतात ‘ही’ शस्त्रे; एकाच वेळी संपूर्ण देश गिळंकृत करू शकण्याची क्षमता
वर्षावन नष्ट होण्याची वेगवान प्रक्रिया
एकेकाळी ६ दशलक्ष चौरस मैलांहून अधिक क्षेत्रफळ असलेली वर्षावने आज २.४ दशलक्ष चौरस मैलांपर्यंत मर्यादित झाली आहेत. ही आकडेवारी केवळ धक्कादायकच नाही तर भविष्यातील धोक्याची गजर आहे. जंगलतोड हे वर्षावन नष्ट होण्याचे सर्वात मोठे कारण मानले जाते. मोठ्या प्रमाणावर होत असलेले वृक्षतोड, शेतीसाठी जंगलांचे रूपांतर, औद्योगिकीकरण आणि शहरांचा विस्तार यामुळे ही वर्षावने झपाट्याने नष्ट होत आहेत.
जगातील सर्वात मोठे वर्षावन – अमेझॉन
जगातील सर्वात मोठे वर्षावन अमेझॉन रेनफॉरेस्ट आहे. हे वर्षावन ५.५ दशलक्ष चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले आहे आणि नऊ दक्षिण अमेरिकन देशांमध्ये त्याचा विस्तार आहे. या घनदाट जंगलात तापीर, सिल्व्हरबॅक गोरिला यांसारखे दुर्मिळ प्राणी आढळतात. अमेझॉनच्या नष्ट होणाऱ्या जंगलांची स्थिती जगासाठी गंभीर इशारा आहे.

World Rainforest Day : पुढील १०० वर्षांत पर्जन्यवने होतील गायब; भारतातील ‘या’ ठिकाणी घेता येईल आजही स्वर्गसुखाचा अनुभव ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
भारत – वर्षावनांचा अदृश्य खजिना
जगभरात वर्षावनांची संख्या कमी होत असली तरी भारतात काही निसर्गसंपन्न प्रदेश आजही वर्षावनांचे सौंदर्य टिकवून आहेत.
1. पश्चिम घाट – महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळमधील पश्चिम घाट हा भारतातील प्रमुख वर्षावन प्रदेश आहे. येथे ४००० हून अधिक प्रजातींचे जैवविविधतेचे अस्तित्व आहे. पावसाळ्यात या भागात पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात.
2.ईशान्य भारत – आसाम, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्येही घनदाट वर्षावन आहेत. इथे वर्षभर मुसळधार पावसामुळे हिरवळ टिकून राहते, आणि निसर्गप्रेमींना खास अनुभव मिळतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : आता जग भीतीच्या छायेत! अमेरिकेची इराणवर ‘First strike’ची तयारी? ‘Diego Garcia’वर बी-2 बॉम्बर्सची तैनाती
वर्षावन दिनाचे महत्त्व आणि आपली भूमिका
जागतिक वर्षावन दिन आपल्याला हे समजावतो की नैसर्गिक साधनांचा उपभोग घेणाऱ्या मानवाने आता त्यांचे रक्षण करण्याची जबाबदारीही स्वीकारली पाहिजे. वृक्षतोड थांबवणे, पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारणे, आणि जैवविविधतेच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. कारण, जर वर्षावने गेली, तर मानवजातीच्या अस्तित्वावरही प्रश्नचिन्ह उभे राहील.