आता महिला क्रिकेटमध्ये Transgender players ला खेळता येणार नाही!(फोटो-सोशल मीडिया)
Transgender players banned : इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाकडून महिला आणि मुलींच्या सामन्यांमध्ये ट्रान्सजेंडर खेळाडूंना भाग घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आता महिला आणि मुलींच्या सामन्यांमध्ये ट्रान्सजेंडर भाग घेऊ शकणार नाहीत. फुटबॉल असोसिएशन (एफए) ने देखील असाच निर्णय घेतला आहे. एफएच्या निर्णयाच्या २४ तासांच्या आत, ईसीबीने सुद्धा हा निर्णय घेतला आहे.
ईसीबीकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या अलिकडे आलेल्या निर्णयानंतर कायदा अद्ययावत झाल्यानंतर ट्रान्सजेंडर खेळाडूंच्या पात्रतेबाबतच्या त्यांच्या नियमांमध्ये बदल जाहीर केले जात आहेत, ज्यामध्ये स्पष्ट केले आहे की महिलांच्या कायदेशीर व्याख्येत ट्रान्सजेंडरचा समावेश नाही.
हेही वाचा : ‘मला कोणतीही नोटीस मिळाली नाही’ KCA ने लादलेल्या 3 वर्षांच्या बंदीबाबत श्रीशांतने सोडले मौन
ईसीबीच्या निवेदनात असे म्हटले आहे की, ‘तात्काळ प्रभावाने, ज्या खेळाडूंचे जैविक लिंग महिला आहे तेच महिला क्रिकेट आणि मुलींच्या क्रिकेट सामन्यांमध्ये खेळण्यास पात्र असतील. ‘ट्रान्सजेंडर’ महिला आणि मुली खुल्या आणि मिश्र क्रिकेटमध्ये खेळू शकतात. ईसीबीकडून सांगण्यात आले आहे की, न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे महिला आणि मुलींच्या क्रिकेटसाठी नवीन नियम तयार करण्यास त्यांना प्रेरणा मिळाली आहे.
ECB update on transgender participation in women’s cricket
— England and Wales Cricket Board (@ECB_cricket) May 2, 2025
या निर्णयाचा ट्रान्सजेंडर महिला आणि मुलींवर काय परिणाम होईल? याची त्यांना पूर्ण जाणीव आहे, असे ईसीबीकडून सांगण्यात आले आहे. या बदलामुळे प्रभावित झालेल्यांना मदत करण्यासाठी ते स्थानिक क्रिकेट संघटनांसोबत जुळवून काम करतील.
ईसीबीने असे देखील म्हटले आहे की ते समानता आणि मानवाधिकार आयोगाकडून नवीन मार्गदर्शक तत्त्वांची वाट पाहत आहेत आणि ते समजून घेतल्यानंतर पुढील पावले टाकण्यात येतील. क्रिकेटमध्ये कोणत्याही प्रकारच्या भेदभावाला किंवा गैरवापराला थारा नसल्याचे बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. क्रिकेट हा सर्वांसाठी आदरणीय आणि समावेशक खेळ राहावा हे त्यांचे ध्येय आहे, असल्याचे म्हटले आहे.