साई सुदर्शन(फोटो-सोशल मिडिया)
GT vs SRH : आयपीएल २०२५ चा ५१ वा सामना अहमदाबाद नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. या सामन्यात गुजरातने हैदराबादचा ३८ धावांनी पराभव केला. हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करत २२४ धावा केल्या. शुभमन गिल आणि जोस बटलर यांच्या अर्धशतकांच्या जोरावर गुजरात संघाने २०० चा आकडा पार केला. या सामन्यात गुजरातच्या साई सुदर्शनची २३ चेंडूत ४८ धावांच्या खेळीने सर्वांचे लक्ष वेधले. या खेळीसह त्याने खास कामगिरी केली आहे. तो टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद २००० धावा करणारा दुसरा फलंदाज बनला आहे.
तमिळनाडूचा डावखुरा फलंदाज साई सुदर्शनने ५५ व्या टी-२० सामन्याच्या ५४ व्या डावात २००० धावांचा टप्पा पार केला. अशी कामगिरी करणारा तो जगातील दुसराच फलंदाज ठरला आहे. याआधी ऑस्ट्रेलियाच्या शॉन मार्शने कमी डावांमध्ये ही कामगिरी करून दाखवली आहे. . तो ५३ व्या डावात २००० धावा पूर्ण करणारा पहिला खेळाडू ठरला होता.
हेही वाचा : ‘मला कोणतीही नोटीस मिळाली नाही’ KCA ने लादलेल्या 3 वर्षांच्या बंदीबाबत श्रीशांतने सोडले मौन
शुक्रवारी झालेल्या सामन्यात साई सुदर्शनला टी-२० मध्ये २००० धावा पूर्ण करण्यासाठी ३२ धावांची आवश्यकता होती. त्याने हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर एक धाव घेत ही कामगिरी पूर्ण केली. त्याने डावाच्या पाचव्याच षटकात ही कामगिरी करून इतिहास रचला. याआधी तो सर्वात जलद १५०० धावा करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला होता.
टी-२० क्रिकेटमध्ये २००० धावा पूर्ण करण्यापूर्वीच साई सुदर्शनने गुजरात टायटन्सकडून आयपीएलमध्ये १५०० धावा केल्या. त्याने ही कामगिरी फक्त ३५ सामन्यांमध्ये केली. यासह त्याने सचिन तेंडुलकरचा विक्रम देखील मोडीत काढला, ज्याने आयपीएलमध्ये ४४ डाव खेळून १५०० धावा केल्या होत्या. आता सुदर्शन आयपीएलमध्ये सर्वात जलद १५०० धावा करणारा भारतीय फलंदाज बनला आहे.
या वर्षीच्या म्हणजेच आयपीएल २०२५ मध्ये सुदर्शन उत्तम फॉर्ममध्ये आहे. तो आयपीएल २०२५ मध्ये टॉप जीटी आणि एकूण सर्वाधिक धावा करणारा खेळाडूही आहे. त्याने आयपीएल २०२५ हंगामाची सुरुवात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पंजाब किंग्ज (७४) आणि मुंबई इंडियन्स (६३) विरुद्ध सलग दोन अर्धशतके लगावत धमकेदार सुरवात केली होती. त्यानंतर २ एप्रिल रोजी एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध ४९ धावांची खेळी केली होती.