विजय हजारे ट्रॉफीत अभिषेक शर्माचा मोठा विक्रम; अवघ्या 96 चेंडूत शानदार 170 धावा
अहमदाबाद : एकीकडे भारतीय संघ ऑस्ट्रेलियात संघर्ष करीत आहे आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या फलंदाजांच्या बदलीच्या शोधात आहे, तर दुसरीकडे काही तरुणांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये स्वत:ला सिद्ध केले आहे. त्यापैकीच एक म्हणजे अभिषेक शर्मा. पंजाब आणि सौराष्ट्र यांच्यातील विजय हजारे करंडक फेरीच्या पाचव्या सामन्यात शुभमन गिलच्या जवळच्या मित्राने शानदार फलंदाजी केली आणि 96 चेंडूत 177 धावा केल्या. त्याच्या आणि प्रभसिमरन सिंगच्या दमदार शतकांच्या जोरावर पंजाबने 5 गड्यांच्या मोबदल्यात 424 धावा केल्या.
प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर पंजाब संघाची धमाकेदार खेळी
अहमदाबादच्या गुजरात कॉलेज मैदानावर नाणेफेक हारून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर पंजाब संघाने 31 षटकांत 298 धावा केल्या. त्यासाठी कर्णधार अभिषेक शर्माने विध्वंसक फलंदाजी केली आणि दुसऱ्या टोकाला प्रभसिमरन सिंगनेही चमत्कार घडवला. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी 298 धावा केल्या. विजय हजारे ट्रॉफीमध्ये पहिल्या विकेटसाठी केलेली ही सर्वोच्च भागीदारी आहे. यादरम्यान टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या अभिषेक शर्माने धडाकेबाज फलंदाजी केली. त्याने 96 चेंडूत 22 चौकार आणि 8 षटकार ठोकले.
प्रभसिमरन सिंगनेसुद्धा ठोकल्या धावा
दुसऱ्या टोकाला प्रभसिमरन सिंगने 95 चेंडूंचा सामना करताना 11 चौकार आणि 8 षटकार मारले. त्याने 125 धावा केल्या. यानंतर अखेरच्या सामन्यात अनमोल मल्होत्राने 45 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने नाबाद 48 धावा केल्या तर सनवीर सिंगने 29 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने नाबाद 40 धावांची खेळी केली. अभिषेक शर्मा ज्या पद्धतीने फलंदाजी करत आहे त्यावरून असे दिसते की तो लवकरच भारताकडून वनडे आणि कसोटी या दोन्ही सामन्यांमध्ये खेळताना दिसणार आहे.
१९ वर्षांखालील विश्वविजेत्या संघात समावेश
19 वर्षाखालील विश्वचषक 2018 मध्ये अभिषेक शर्मा शुभमन गिल आणि पृथ्वी शॉसोबत खेळला. या हंगामात, राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली, संघाने विश्वविजेते होण्याचा मान मिळवला होता, तर पृथ्वी शॉ आणि शुभमन गिल यांनी यापूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. यावर्षी आयपीएलमधील धमाकेदार कामगिरीच्या जोरावर अभिषेकने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही पदार्पण केले.
हेही वाचा : ‘चक दे इंडिया’ गाणं वाजताच हॉस्पिटलमध्ये नाचू लागले विनोद कांबळी, व्हिडीओ व्हायरल