नोवाक जोकोविच(फोटो-सोशल मीडिया)
US Open 2025 : सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविचने आपल्या खराब फॉर्मवर मात करत जोरदार मुसंडी मारली आहे. नोवाक जोकोविच सध्या यूएस ओपन २०२५ स्पर्धेत खेळत आहे. या दरम्यान, त्याने स्पर्धेच्या चौथ्या फेरीत धडक मारली आहे. या स्पर्धेत त्याने बिगर मानांकित ब्रिटिश खेळाडू कॅमेरॉन नारीचा ६-४, ६-७ (४), ६-२, ६-३ असा पराभव करून चौथ्या फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे.
या विजयासह नोवाक जोकोविचने टेनिसच्या जगात अजून एक मोठा भीम पराक्रम केला आहे. आता ३८ वर्षीय जोकोविच यूएस ओपनच्या शेवटच्या १६ मध्ये पोहोचणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम जिमी कार्नेसच्या नावावर जमा होता. त्याने १९९१ मध्ये ही किमया साधली होती. जोकोविचने त्याचा १०२ वा विजय साकार केला आहे. तसेच त्याने प्रमुख स्पर्धांमध्ये सर्वाधिक हार्डकोर्ट विजयांसाठी रॉजर फेडररला देखील पिछाडीवर टाकले आहे. चार वेळा यूएस ओपन चॅम्पियन असणाऱ्या नोरीविरुद्धच्या त्याच्या प्रभावी रेकॉर्डला ७-० यापर्यंत पोहचवले.
हेही वाचा : BWF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सात्विक-चिरागची उपांत्य फेरीत धडक! भारताचे पदक पक्के
विजयानंतर जोकोविचने प्रतिक्रिया दिली. जोकोविच म्हणाला की, “मला वाटते की कोणत्याही सामन्यामध्ये तुम्हाला कोणत्याही नाट्याशिवाय सरळ सेटमध्ये जिंकायचे असते आणि सहज जिंकायचे असते. परंतु ते शक्य नाही. माझ्या टीमला वाटते की मी कोर्टवर जास्त संघर्ष करावा जेणेकरून मी सामने खेळण्यात अधिक वेळ घालवू शकेन. मी विम्बल्डननंतर कोणताही सामना खेळलो नाही.” तो पुढे म्हणाला की, “मी अजून देखील कोर्टवर माझी लय शोधण्याचा प्रयत्न करत आहे.”
पहिल्या सेटमध्ये ५-४ अशी आघाडी घेतल्यानंतर, नोवाक जोकोविचला पाठीचा त्रास जाणवू लागला होता. तो सेट पूर्ण करण्यासाठी परतण्यापूर्वी उपचारासाठी काही काळ कोर्टाबाहेर गेला होता. जोकोविचने दुसरा सेट अधिक काळजीपूर्वक सुरू केला होता. त्याच्या सर्व्हिसचा वेग मंद असल्याचे दिसून आले.
हेही वाचा : Photo : कर्णधार म्हणून सर्वाधिक T20 सामने कोणी जिंकले? कोहली-गंभीर टाॅप 5 च्या शर्यतीतून बाहेर; डू प्लेसिस…
नोवॉक जोकोविचला कठीण टायब्रेकरमध्ये थोडा संघर्ष करावा लागला, त्यावेळी नोरीने जिंकला. नोरीने तिसऱ्या सेटच्या सुरुवातीलाच त्याची सर्व्हिस ब्रेक केली, परंतु जोकोविचकडून जोरदार प्रतिउत्तर देत सलग तीन गेम जिंकून प्रत्युत्तर देण्यात आले. पूर्ण नियंत्रण मिळवत, जोकोविचने तिसरा सेटचा शेवट केला आणि चौथ्या सेटवर वर्चस्व गाजवत विजय निश्चित केला. जोकोविचचा पुढील सामना जॅन-लेनार्ड स्ट्रफशी होणार आहे.