कार्लोस अल्काराझ(फोटो-सोशल मीडिया)
Carlos Alcaraz in the final of the Australian Open 2026 : स्पेनच्या कार्लोस अल्काराझने २०२६ च्या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या च्या उपांत्य फेरीत अलेक्झांडर झ्वेरेव्हला पराभूत करत अंतिम फेरीमध्ये दिमाखात प्रवेश केला. कार्लोस अल्काराझने ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. दुखापतग्रस्त असून देखील २२ वर्षीय अल्काराझने शुक्रवारी पाच तासांपेक्षा जास्त काळ चाललेल्या सामन्यात जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हचा ६-४, ७-६(५), ६-७(३), ६-७(४), ७-५ असा पराभव करत अंतिम फेरी गाठली.
कार्लोस अल्काराझ सामन्यादरम्यान जखमी झाला आणि त्याने टाइमआउट घेतला. अल्काराझच्या टाइमआउट घेण्याच्या निर्णयावर अलेक्झांडर झ्वेरेव्हने नाराज दिसून आला होता. त्याने सांगितले की स्पेनच्या खेळाडूला क्रॅम्प्स होते आणि त्याला खेळाच्या मध्यभागी टाइमआउट घेण्याची परवानगी देण्यात येऊ नये. अलेक्झांडर झ्वेरेव्ह अधिकाऱ्यांशी वाद घालताना दिसला, तर तेव्हा अल्काराझने त्याच्या फिजिओकडून उपचार घेतले होते.
पाच तास आणि २७ मिनिटे चाललेल्या पाच सेटच्या सामन्यामध्ये, कार्लोस अल्काराजने अखेर विजय मिळवला आणि त्याचा पहिला ऑस्ट्रेलियन ओपन फायनलमध्ये प्रवेश केला. सामन्यानंतर, दोन्ही खेळाडूंनी मिठी मारली आणि सामन्यादरम्यान उद्भवलेल्या तक्रारी मागे सारल्या.
विजयानंतर, अल्काराजने प्रतिक्रिया दिली, तो म्हणाला, “तुम्ही कशाशी देखील संघर्ष करत आहात, तुम्ही कशातून तरी जात आहात, काहीही झाले तरी, तुम्हाला नेहमीच स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. तिसऱ्या सेटच्या मध्यभागी मी संघर्ष करत होतो. शारीरिकदृष्ट्या, माझ्या छोट्या कारकिर्दीत मी खेळलेल्या सर्वात कठीण सामन्यांपैकी हा एक सामना होता, परंतु मी अशा परिस्थितीतून गेलो आहे.”
हेही वाचा : T20 World Cup 2026 : टी२० विश्वचषकापूर्वी न्यूझीलंडचा मोठा डाव! ‘या’ वेगवान गोलंदाजाला दिली ताफ्यात जागा
अल्काराज पुढे म्हणतो की, “मी याआधी अशा सामन्यात खेळलो आहे,” तो म्हणाला की “म्हणून मला काय करायचे आहे हे माहित होते. मला सामन्यात माझे मन लावावे लागले. मला वाटते की मी ते केले. मी शेवटच्या चेंडूपर्यंत लढलो. मला माहित होते की माझ्याकडे माझ्या संधी आहेत. पाचव्या सेटमध्ये मी उत्साही होतो, तुम्हाला माहिती आहे, पण मला स्वतःवर, माझ्या भावनांवर आणि मी परतण्याच्या या पद्धतीवर खूप अभिमान होता.”
सिनरविरुद्धच्या उपांत्य सामन्यापूर्वी नोवाक जोकोविचने अल्काराजचे अंतिम फेरीत पोहोचल्याबद्दल अभिनंदन केले आहे. कार्लोस अल्काराजचा सामना दुसऱ्या उपांत्य सामन्याच्या विजेत्याशी होणार आहे. दुसरा उपांत्य सामना जॅनिक सिनर आणि नोवाक जोकोविच यांच्यात खेळला जाणार आहे. जर अल्काराजने अंतिम फेरी जिंकली तर तो पुरुष एकेरीत करिअर ग्रँड स्लॅम पूर्ण करणारा सर्वात तरुण खेळाडू बनेल.






