बजरंग पुनिया : भारतीय स्टार कुस्तीपटू बजरंग पुनिया (Bajrang Punia) मागील काही काळापासून त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. ऑलिम्पिक चाचण्यांपूर्वी स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाला मोठा झटका बसला आहे. नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीने भारतीय कुस्तीपटूला तात्पुरते निलंबित केले आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या बजरंगवर चाचण्यांदरम्यान डोप चाचणीसाठी नमुना सादर न केल्यामुळे NADA ने तात्पुरती बंदी घातली आहे.
एका सूत्राने ‘इंडिया टुडे’ला सांगितले की, बजरंग पुनियाने सोनीपत येथे झालेल्या चाचण्यांदरम्यान डोप चाचणीसाठी लघवीचा नमुना देण्यास नकार दिला होता. सोनीपत टाईल्समध्ये रोहित कुमारकडून पराभूत झाल्यानंतर बजरंग परिसराबाहेर गेला होता. राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेच्या अधिकाऱ्यांनी डोप चाचणीसाठी बजरंग पुनियाचे नमुने गोळा करण्याचा प्रयत्न केला होता, पण तो सामन्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या फेरीलाही थांबला नाही. पुनियाने रशियातील चाचणीसाठी तयारी केली होती.
जाणून घ्या वादाचं मूळ कारण
10 मार्च रोजी NADA ने बजरंग पुनियाकडून डोप चाचणीसाठी नमुने मागवले होते, परंतु भारतीय कुस्तीपटूने नकार दिला होता. NADA ला WADA (World Anti Doping Agency) ला सांगावे लागले की एखाद्या खेळाडूने त्याचा नमुना का दिला नाही. दरम्यान, नाडा आणि वाडा यांच्यात दीर्घ संवाद झाला. यानंतर वाडाने नाडाला खेळाडूला नोटीस बजावून नमुना देण्यास का नकार दिला, अशी विचारणा केली. त्यानंतर 23 एप्रिल रोजी NADA ने नोटीस बजावली आणि बजरंग पुनियाकडून 7 मे पर्यंत उत्तर मागितले. निलंबन उठेपर्यंत पुनिया कोणत्याही चाचण्यांमध्ये किंवा स्पर्धेत भाग घेऊ शकणार नाही आणि आरोप प्रलंबित राहिल्यास, त्याला ऑलिम्पिकसाठी आगामी चाचण्यांमध्ये भाग घेण्यासही प्रतिबंध केला जाऊ शकतो.