फोटो सौजन्य - सोशल मीडिया
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 फेब्रुवारीमध्ये होणार आहे. परंतु अजुनपर्यत चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये होणार की हायब्रीड पद्धतीने होणार यासंदर्भात आयसीसीने कोणत्याही प्रकराची माहिती दिलेली नाही त्याचबरोबर चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक सुद्धा जाहीर करण्यात आले नाही. अनेक वृत्तांच्या मार्फत अनेक तर्कवितर्क लावले आहेत.
चॅम्पियन्स ट्रॉफीचा वाद अखेर शनिवारी 14 डिसेंबर रोजी संपुष्टात येऊ शकतो. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI), आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) यांच्यात आज अधिकृत चर्चा होणार आहे. महिनाभर सुरू असलेल्या कार्यक्रमांमध्ये अनेक चढ-उतार आले. आता अंतिम निर्णय होणार असे दिसते. याबाबत आयसीसीचे नवे अध्यक्ष जय शाह आणि पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्यात चर्चा होणार आहे.
आयसीसीचे उच्च अधिकारी शनिवारी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसिन नक्वी यांच्यासोबत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी हायब्रीड मॉडेलच्या रूपरेषेला अंतिम रूप देण्याची शक्यता आहे. वेळापत्रकही आज जाहीर केले जाऊ शकते. आयसीसी स्पर्धांसाठी भारत किंवा पाकिस्तान दोघेही एकमेकांच्या देशात जाणार नाहीत यावर तत्त्वत: सहमती झाली आहे. अशा परिस्थितीत 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान भारत आणि पाकिस्तान दुबईत खेळणार आहेत.
चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान करण्यात येणार आहे. चॅम्पियन ट्रॉफीच्या या स्पर्धेत आठ संघ सहभागी होणार आहेत, या संघाची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. भारत आणि पाकिस्तानला दिल्या जाणाऱ्या सर्व आयसीसी टूर्नामेंटसाठी समान व्यवस्था केली गेली तरच ते हायब्रीड मॉडेल स्वीकारण्यास तयार असल्याचे पीसीबीने म्हटले होते. याचा अर्थ असा की जेव्हा भारत 2025 च्या महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भूषवतो तेव्हा पाकिस्तान शेजारच्या देशात जाणार नाही आणि त्याच्याविरुद्ध तटस्थ ठिकाणी खेळेल.
भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने 2026 च्या पुरुषांच्या T20 विश्वचषकादरम्यानही हे घडेल. भारत पाकिस्तानविरुद्धचा महत्त्वाचा सामना घरच्या मैदानावर खेळू शकणार नाही आणि त्याऐवजी मोठ्या सामन्यासाठी श्रीलंकेला जाईल. आयसीसीच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, “एक व्हर्च्युअल मीटिंग आहे ज्यामध्ये आयसीसीचे अध्यक्ष जय शाह ब्रिस्बेनहून सामील होतील. यानंतर आयसीसी अधिकृत घोषणा करेल अशी अपेक्षा आहे.
सध्या, हायब्रीड मॉडेल स्वीकारल्याबद्दल पीसीबीला कोणतीही भरपाई दिली जाणार नाही. 2008 च्या आशिया चषकानंतर भारताने पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. मात्र, गेल्या वर्षी एकदिवसीय विश्वचषकासाठी पाकिस्तान भारतात आला होता.