क्रिकेटविश्वात खळबळ! मॅच फिक्सिंगमध्ये थेट टीमच्या मालकालाच अटक; संघ मैदानात येणार तोच घडला धक्कादायक प्रकार
Sri Lanka Cricket Match Fixing Case : श्रीलंका क्रिकेटने T10 ची नवीन लीग सुरू केली. खेळाचे हे सर्वात लहान स्वरूप आहे आणि त्याचा पहिला हंगाम 11 डिसेंबरपासून सुरू झाला, परंतु स्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशी, एका फ्रेंचायझीच्या मालकाला पोलिसांनी अटक केली. पकडलेला संघ मालक भारतीय नागरिक आहे.
मॅच फिक्सिंगचा धोकाही वाढतोय
जगाच्या विविध भागात क्रिकेट लीग झपाट्याने वाढत असल्याने मॅच फिक्सिंगचा धोकाही वाढत आहे. अशीच एक अलीकडील घटना श्रीलंकेतून समोर आली आहे. जिथे नवीन लीग सुरू होताच संघ मालकाला अटक करण्यात आली. हे खळबळजनक प्रकरण श्रीलंका क्रिकेटच्या नवीन लंका T10 लीग स्पर्धेच्या पहिल्या सत्राच्या दुसऱ्या दिवशी उघडकीस आली आहे, ज्यामध्ये गॅले मार्व्हल्स फ्रँचायझी मालक प्रेम ठाकूरला श्रीलंकेच्या स्पोर्ट्स पोलिस युनिटने अटक केली होती. एका विदेशी खेळाडूने प्रेम ठाकूरविरोधात तक्रार केली होती, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
सामन्याच्या दिवशी अटक
ESPN-Cricinfo च्या रिपोर्टनुसार, ही नवीन लीग बुधवार 11 डिसेंबरपासून सुरू झाली आणि पहिल्याच दिवशी 3 सामने खेळले गेले. यामध्ये गॅले मार्व्हल्सनेही पहिला सामना जिंकला. गुरुवारी, 12 डिसेंबर हा स्पर्धेचा दुसरा दिवस होता आणि गॉल संघाला पुन्हा मैदानात उतरावे लागले. पण माजी संघमालक प्रेम ठाकूर याला श्रीलंकेच्या स्पोर्ट्स पोलिस युनिटने अटक केली. या अटकेची बातमी संघाने मैदानात उतरण्यापूर्वीच आली असली तरी पावसामुळे सामना होऊ शकला नाही.
प्रेम ठाकूर हा भारतीय नागरिक
प्रेम ठाकूरला कँडी येथील हॉटेलमधून अटक करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या लीगचे सामने या शहरात खेळवले जात आहेत. अटक करण्यात आलेला प्रेम ठाकूर हा भारतीय नागरिक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रेम ठाकूरकडून ऑफर आल्यानंतर एका विदेशी खेळाडूने मॅच फिक्सिंगची तक्रार केली होती. श्रीलंका क्रिकेटने या स्पर्धेसाठी आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी युनिटच्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली.
यापुढेही स्पर्धा सुरू राहणार
ही तक्रार या अधिकाऱ्याकडे गेली, त्यानंतर ठाकूरला अटक करण्यात आली. त्याला 2019 मध्ये बनवलेल्या कायद्यानुसार अटक करण्यात आली आहे, जो क्रीडा क्षेत्रातील गुन्हे रोखण्यासाठी बनवण्यात आला होता. अटक केल्यानंतर, श्रीलंकेच्या पोलिसांनी प्रेम ठाकूरला शुक्रवारी, 13 डिसेंबर रोजी न्यायालयात हजर केले, तेथून त्याला 16 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या वृत्ताने एकच खळबळ उडाली असतानाच, लीग आपल्या वेळापत्रकानुसार सुरू राहणार असल्याचे टूर्नामेंट संचालकांनी स्पष्ट केले आहे.