शाई होप(फोटो-सोशल मीडिया)
PAK vs WI: पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळवण्यात आलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेचा समारोप झाला आहे. या दोन संघात खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजने पाकिस्तानवर एकतर्फी २०२ धावांनी विजय मिळवला आहे. हा पाकिस्तानसाठी लाजिरवाणा पराभव मनाला जात आहे. दुसरीकडे, हा विजय वेस्ट इंडिज संघासाठी आत्मविश्वास वाढवणारा ठरला आहे. या सामन्यात कॅरेबियन शाई होपने कर्णधाराला साजेशी खेळी साकारली आहे.
शाई होपने तिसऱ्या आणि महत्त्वाच्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध १२० धावांची धमाकेदार खेळी केली. यासह, त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये एक महत्त्वाची कामगिरी करून दाखवली आहे. शाई होप एकदिवसीय स्वरूपात १८ शतके करणारा वेस्ट इंडिजचा तिसरा खेळाडू ठरला आहे. सर्वाधिक शतकांच्या बाबतीत शाई होप तिसऱ्या स्थानावर जाऊन पोहचला आहे.
हेही वाचा : Suresh Raina: बेटिंग App प्रकरणात सुरेश रैनावर कोणते आरोप? ED च्या फेऱ्यात अडकला, चौकशीसाठी बोलावले
सर्वाधिक एकदिवसीय शतके करणाऱ्या वेस्ट इंडिजच्या खेळाडूंच्या यादीमध्ये ख्रिस गेल आणि ब्रायन लारा या दिग्गजांची नावे आहेत. ख्रिस गेलने २९८ सामन्यांमध्ये २५ शतके ठोकली आहेत. तर ब्रायन लाराने २९५ सामन्यांमध्ये १९ शतके साकारली आहेत.
वेस्ट इंडिजला गरज असताना शाई होपने ही शतकी खेळी साकारली आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पाकिस्तानने जिंकला होता, त्यानंतर वेस्ट इंडिजने पुढचा सामना जिंकला आणि मालिका १-१ अशी बरोबरीत आणली होती. अशा परिस्थितीत तिसरा आणि शेवटचा सामना दोन्ही संघासाठी निर्णायक होता. यामध्ये वेस्ट इंडिजने बाजी मारली आणि मालिका २-१ अशी जिंकली.
त्रिनिदादमध्ये नाणेफेक गमावल्यानंतर, वेस्ट इंडिज प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरले. यावेळी त्यांची स्थिती वाईट झाली. वेस्ट इंडिजच्या ६८ धावांत तीन विकेट गेल्या असताना शाई होपने कर्णधारपदाची खेळी खेळत शतक झळकावले. शाई होपने शेरफेन रुदरफोर्ड (१५) सोबत तिसऱ्या विकेटसाठी ४५ धावा जोडल्या. तसेच त्याने जस्टिन ग्रीव्हज सोबत ११० धावांची अभ्येद्य भागीदारी रचली आणि वेस्ट इंडिजचा डाव २९४ पर्यंत पोहचवला.
शाई होपने ८३ चेंडूत आपले शतक झळकावले. हे त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील १८ वे शतक ठरले. तर हे त्याचे पाकिस्तानविरुद्धचे दुसरे एकदिवसीय शतक होते. या डावात शाई होपने ९४ चेंडूत १२० धावा केल्या. यामध्ये त्याने ५ षटकार आणि १० चौकार लगावले. तर ग्रीव्हज २४ चेंडूंमध्ये ४३ धावा करून नाबाद राहिला.