दक्षिण आफ्रिका टी२० लीग (South Africa T20 League) खेळवली जाणार आहे. यामध्ये चेन्नई सुपर किंग्स क्रिकेट लिमिटेडच्या जोहान्सबर्ग फ्रँचायझीला दक्षिण आफ्रिका टी२० लीगमध्ये ‘जोबर्ग सुपर किंग्स’ असे नाव देण्यात आले आहे.
चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) त्यांचा जुना खेळाडू फाफ डू प्लेसिसवर मोठी जबाबदारी सोपवली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या टी २० लीगमध्ये जोहान्सबर्ग सुपर किंग्स संघाच्या कर्णधारपदाची धुरा सीएसकेने डु प्लेसिसला देण्यात आलेली आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार डू प्लेसिसचा फ्रँचायझीने थेट करार करून संघात समावेश केला आहे. त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग्जचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग आता जोहान्सबर्ग सुपर किंग्जच्याही प्रशिक्षकाची भूमिका बजावणार आहेत.
दक्षिण आफ्रिका टी२० लीगमध्ये सीएसके व्यतिरिक्त मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपरजायंट्स या फ्रॅचायजींनीही संघ विकत घेतले आहेत. तर चेन्नईने जोहान्सबर्ग फ्रॅचायजींला सर्वोच्च बोली लावत विकत घेतले. पुढील वर्षी दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जाणाऱ्या टी२० लीगमध्ये निम्म्यापेक्षा सर्वाधिक संघ इंडियन प्रीमियर लीगच्या फ्रॅंचायजींनी विकत घेतले आहेत. यामुळे या लीगला मिनी आयपीएल देखील म्हटले जात आहे.
एका प्रसिद्धीपत्रकानुसार, सीएसकेसीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी केएस विश्वनाथन, दक्षिण आफ्रिका २० लीगचे आयुक्त ग्रॅमी स्मिथ, जॉबर्ग सुपर किंग्जचा कर्णधार डू प्लेसिस, मुख्य प्रशिक्षक फ्लेमिंग आणि जोनो लीफ राइट यांच्यात झालेल्या संवाद सत्रादरम्यान ही घोषणा करण्यात आली.
दक्षिण आफ्रिका टी२० लीग मध्ये सहा फ्रँचायझींना ३० खेळाडूंच्या यादीतून प्रत्येकी पाच खेळाडू निवडण्याचा अधिकार देण्यात आला होता. यामध्ये जोस बटलर आणि लियाम लिव्हिंगस्टोनसारख्या खेळाडूंचा समावेश होता. एका संघात १७ खेळाडू असू शकतात. पाच खेळाडूंव्यतिरिक्त उर्वरित १२ खेळाडूंना खरेदी करण्यासाठी २० सप्टेंबर रोजी लिलाव होणार आहे.