CM Eknath Shinde Announces 11 Crores Prize for Team India : महाराष्ट्रातील विधान भवनात पहिल्यांदाच विश्वचॅम्पियन बनलेल्या टीम इंडियाचा सन्मान करण्यात आला. यावेळी खास करून महाराष्ट्रीयन मुंबईकर असलेल्या रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे यांचा सन्मान कऱण्यात आला. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी टीम इंडियाचे कौतुक करताना मुंबईकर असलेल्या या चार खेळाडूंचा आम्हाला आनंद आणि अभिमान असल्याचे सांगितले. यानंतर टीम इंडियाला 11 कोटींचे बक्षीस देखील जाहीर केले. काल अगोदरच या चार खेळाडूंना 1 कोटींचे बक्षीस जाहीर केले होते. आता पुन्हा एकदा टीम इंडियासाठी 11 कोटींची घोषणा केली.
पहिल्यांदाच विधान भवनात सत्कार
#WATCH | Mumbai | Team India captain Rohit Sharma speaks in Maharashtra Vidhan Bhavan as Indian men's cricket team members are being felicitated by CM Eknath Shinde and Deputy CM Devendra Fadnavis
(Source: Maharashtra Assembly) pic.twitter.com/I51K2KqgDV
— ANI (@ANI) July 5, 2024
विश्वचॅम्पियन बनलेल्या टीम इंडियावर बक्षिसांचा अक्षरश: पाऊस
विश्वचॅम्पियन बनलेल्या टीम इंडियावर बक्षिसांचा अक्षरश: पाऊस पडताना दिसत आहे. बीसीसीआयने टीम इंडियाला 125 कोटी रुपयांच्या बक्षीसाची आधीच घोषणा केली होती. यानंतर राज्य सरकारकडून टीम इंडियातील चार मुंबईकर खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, यशस्वी जयस्वाल यांचा समावेश आहे. या चारही खेळाडूंना राज्य सरकारकडून प्रत्येकी 1 कोटी रुपयांचं बक्षीस देण्यात आलं. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आणखी मोठी घोषणा करीत टीम इंडियाला आश्चर्याचा धक्का दिला आहे.
भारतीय संघाचे काल मुंबईत दणक्यात स्वागत
आपल्या लाडक्या खेळाडूंना पाहण्यासाठी अख्खी मुंबई क्रिकेटमय झाली होती. संपूर्ण वानखेडे स्टेडियम चाहत्यांनी भरलेले होते. मरीन ड्राईव्हवरसुद्धा क्रिकेट चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. तर वानखेडे स्टेडियमवर एवढी गर्दी झाली की, अखेर वानखेडे स्टेडियमचे गेट बंद केले होते. वानखेडे स्टेडियममध्ये जागा नसली तरीही चाहत्यांनी स्टेडियमबाहेर गर्दी केली होती. मरीन ड्राईव्हपासून वानखेडे स्टेडियमपर्यंत 2 किमी. अंतरात विजयी परेड निघाली होती. या मिरवणुकीत क्रिकेटप्रेमींनी विक्रमी गर्दी करीत खेळाडूंनासुद्धा आश्चर्याचा धक्का दिला होता.
मुख्यमंत्र्यांकडून खेळाडूंना आश्वासन
यावेळी एकनाथ शिंदे यांनी सूर्यकुमारला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी लागेल, असे बजावलं. तर सूर्यकुमारने पुढचा वर्ल्ड कप देखील जिंकून आणू, असं आश्वासन आज विधान भवनमधील कार्यक्रमात दिलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा केली. “रोहित आणि सूर्यकुमार यांनी सांगितलं की, मुंबईत एमएमआरमध्ये नवीन खेळाडू तयार केले पाहिजेत. त्यासाठी जे काही आवश्यक सहकार्य असेल, जागा असेल, जी काही आवश्यक मदत असेल ते सरकार आपल्याला करेल. कारण तुम्ही खेळाडूंची फॅक्टरी निर्माण करणारे खेळाडू आहेत”, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी याबाबतही महत्त्वाची घोषणा केली.