सूर्यकुमार यादव(फोटो-सोशल मीडिया)
Suryakumar Yadav is set to complete 3000 T20 runs : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिले तिनही सामने भारताने जिंकून मालिकेत ३-० अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील चौथा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना बुधवारी विशाखापट्टणम येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवकडे इतिहास रचण्याची संधी असणार आहे. सूर्यकुमार यादव सध्या चांगलाच फॉर्ममध्ये आहे. या मालिकेत त्याने मागील दोन्ही सामन्यांमध्ये सलग अर्धशतके झळकावली आहेत. या मालिकेतील चौथ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याला आणखी एका खास क्लबमध्ये प्रवेश करण्याची नामी संधी चालून आली आहे.
हेही वाचा : T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषकाचे समीकरण बदलणार! पाकिस्तान बाहेर अन् बांगलादेश आत? ICC चा मोठा डाव
भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने आतापर्यंत १०२ सामन्यांच्या ९६ डावात ३६.९८ च्या सरासरीने आणि १६५.०३ च्या स्ट्राईक रेटने २९५९ धावा फटकावल्या आहेत. जर त्याने विशाखापट्टणममध्ये ४१ धावा केल्या तर तो क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये ३,००० आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करणारा तिसरा भारतीय खेळाडू ठरेल. सूर्यकुमार यादवपूर्वी रोहित आणि कोहली यांनी ही किमया साधली आहे. रोहित शर्माने १५९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ४,२३१ धावा केल्या आहेत, तर विराट कोहलीने १२५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ४,१८८ धावा काढल्या आहेत. तथापि, विराट कोहली आणि रोहित शर्माने आता या स्वरूपातून निवृत्ती घेतली आहे. तसेच आता सूर्यकुमार यादव या स्वरूपात सर्वाधिक सक्रिय भारतीय धावा करणारा फलंदाज आहे.
बुधवारी होणाऱ्या टी२० सामन्यात सूर्यकुमार यादवने ४१ धावा केल्या तर तो ९७ डावांमध्ये त्याचे ३,००० धावा पूर्ण करू शकतो. यामुळे तो टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वात जलद ३,००० धावांचा टप्पा गाठणारा पाचवा फलंदाज ठरेल. मोहम्मद रिझवान या यादीत अव्वल स्थानावर विराजमान आहे, त्याने ७९ डावांमध्ये ही कामगिरी बजावली केली आहे. कोहली आणि बाबर आझम यांनी ८१ डावांमध्ये हा टप्पा गाठला असून तर युएईचा फलंदाज मोहम्मद वसीमने ८४ डावांमध्ये ३,००० धावा पूर्ण केल्या आहेत.
भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल (उपकर्णधार), रिंकू सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, इशान किशन (यष्टीरक्षक), रवी बिश्नोई.
न्यूझीलंड संघ : मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, जेकब डफी, जॅक फोक्स, मॅट हेन्री, काइल जेमिसन, बेवन जेकब्स, डॅरिल मिचेल, जेम्स नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, लॉकी फर्ग्युसन, ईश सोधी, टिम सेफर्ट.






