दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स : आज दमदार शनिवारी दोन सामने रंगणार आहेत. यामध्ये पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (Delhi Capitals vs Mumbai Indians) यांच्यामध्ये रंगणार आहे तर दुसरा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यामध्ये खेळवण्यात येणार आहे. गुजरातचा पराभव करून विजयी मार्गावर परतलेली दिल्ली कॅपिटल्स शनिवारी त्यांच्या घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सचे यजमानपद भूषवणार आहे. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्लीने या मोसमात आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत, ज्यापैकी संघाने 4 जिंकले आहेत आणि पाच सामने गमावले आहेत. तर दुसरीकडे मुंबईची अवस्था आणखी बिकट आहे. हार्दिक पांड्याच्या संघाला 8 पैकी केवळ 3 सामन्यात विजयाची चव चाखता आली आहे.
दिल्ली आणि मुंबई सामनाचा कधी आणि कुठे होणार?
दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स (DC vs MI) यांच्यातील IPL 2024 चा 43 वा सामना दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. आयपीएल 2024 चा 43 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात 27 एप्रिल रोजी होणार आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात दुपारी 3:30 वाजता सुरू होईल. टॉस अर्धा तास आधी होईल. तुम्ही टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स चॅनलवर दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्सचा थेट सामना पाहू शकता. त्याचबरोबर जर तुम्हाला मोबाईलमध्ये पाहायचं असेल तर जिओ सिनेमा ॲपवर तुम्ही दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता.
खेळपट्टीचे स्वरूप काय असेल?
अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर दिल्ली आणि मुंबई यांच्यातील रोमांचक सामना रंगणार आहे. आयपीएल 2024 मध्ये दिल्लीच्या या मैदानावर अनेक चौकार आणि षटकार पाहायला मिळाले आहेत. या मैदानावर गोलंदाजांना धावांवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. दिल्ली आणि गुजरात यांच्यात झालेल्या शेवटच्या सामन्यात 40 षटकात एकूण 444 धावा झाल्या होत्या. दिल्लीने दिलेल्या 225 धावांच्या लक्ष्यापासून गुजरात अवघ्या 4 धावा दूर होता.