फोटो सौजन्य : X
भारत विरुद्ध इंग्लड कसोटी मालिका : इंग्लडच्या संघाची नुकतीच वेस्ट इंडीजविरुद्द टी20 आणि एकदिवसीय मालिका पार पडली. या मालिकेमध्ये इंग्लडच्या संघाने दोन्ही मालिका या एकतर्फी जिंकल्या. चॅम्पियन ट्राॅफीनंतर इंग्लडचा कर्णधार जोस बटलर याने राजीनामा दिला होता. त्यानंतर टी20 मध्ये हॅरी ब्रुक याने संघाची कमान सांभाळली होती. आता भारताचा संघ हा इंग्लडविरुद्ध मालिका खेळणार आहे. या मालिकेत इंग्लडचे कर्णधारपद हे बेन स्टोक्सकडे सोपवण्यात आले आहे. भारतीय संघासाठी इंग्लडचा संघ नक्कीच आव्हान उभे करेल.
आता इंग्लंडचे कोच ब्रेंडन मॅक्युलम यांनी भारतीय युवा संघाला चॅलेंज केले आहे. इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांचा असा विश्वास आहे की भारत पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी चांगली तयारी आणि आत्मविश्वासाने येथे येईल. यासोबतच ते म्हणाले की, कसोटी संघ म्हणून आपल्याला कुठे पोहोचायचे आहे हे त्यांच्या खेळाडूंना चांगलेच समजते.
भारत २० जूनपासून लीड्समध्ये इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेने त्यांच्या नवीन जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची सुरुवात करेल. यावेळी मॅक्युलम म्हणाले की “ते एक उत्तम क्रिकेट खेळणारे राष्ट्र आहे जे येथे मोठ्या अपेक्षांसह येणार आहे आणि आम्ही त्यांच्या आव्हानाची वाट पाहत आहोत,” मॅक्युलमने स्काय स्पोर्ट्स क्रिकेटला सांगितले.
इंग्लंडने अलीकडेच ६ सामन्यांच्या व्हाईट-बॉल मालिकेत वेस्ट इंडिजचा व्हाईटवॉश केला. या वर्षाच्या अखेरीस भारत आणि अॅशेससाठी तयारी करत असताना त्यांचे लक्ष आता रेड-बॉल फॉरमॅटवर आहे. पुढे मॅक्युलम म्हणाला की, “खेळाडूंनी ताजेतवाने राहणे महत्त्वाचे आहे. कसोटी संघ म्हणून आम्हाला कुठे पोहोचायचे आहे हे आम्हाला माहिती आहे.”
इंग्लंडचा संघ वेगवान गोलंदाज मार्क वूडशिवाय खेळणार आहे, जो दुखापतीमुळे किमान पहिल्या तीन कसोटी सामन्यांमधून बाहेर पडला आहे. त्याचा सहकारी वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर देखील पहिल्या कसोटी सामन्याला मुकणार आहे अशी माहीती समोर आली आहे, तर गस अॅटकिन्सन अजूनही हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून सावरत आहे.
न्यूझीलंडचा माजी कर्णधार पुढे म्हणाला की, “आमचे काही चांगले वेगवान गोलंदाज खेळण्यासाठी उपलब्ध नसतील पण आमच्याकडे वेगवान गोलंदाजी विभागात ख्रिस वोक्स, सॅम कुक, ब्रायडन कार्स, जेमी ओव्हरटन, जोश टंगू यांच्या रूपात एक चांगला आणि वैविध्यपूर्ण हल्ला आहे.”