संदीप पाटील(फोटो-सोशल मिडीया)
Sandeep Patil Birthday : भारतीय क्रिकेट संघाचे माजी अनुभवी खेळाडू संदीप पाटील आज १८ ऑगस्ट रोजी त्यांचा ६९ वा वाढदिवस साजरा करत आहेत. पाटील यांचा जन्म १८ ऑगस्ट १९५६ रोजी मुंबई शहरात झाला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून संदीप पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.एक उल्लेखनीय बाब अशी की १९८३ मध्ये संदीप पाटील भारताच्या विश्वविजेत्या संघाचा महत्वाचा भाग राहिले आहेत. यावेळी टीम इंडियाला पहिल्यांदाच क्रिकेटमध्ये विश्वविजेतेपद मिळवून देण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले आहे.
बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटद्वारे संदीप पाटील यांना त्यांच्या ६९ व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी बीसीसीआयकडून पाटील यांचा एक फोटो शेअर करण्यात आला आहे. यामध्ये १९८३ च्या विश्वचषकादरम्यान पाटील यांच्या उत्कृष्ट फलंदाजी आणि नंतर निवडकर्ता आणि प्रशिक्षक म्हणून त्यांच्या योगदानाबद्दल संदीप पाटील यांच्या कार्याची आठवण केली आहे.
हेही वाचा : UP T20 League 2025 : तमन्नाची अदा – दिशा पटानीने घातला धूमाकुळ! उद्घाटन समारंभाचे Photo Viral
संदीप पाटील १९८३ मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा एक महत्वाचा भाग होते. उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध त्यांनी ३२ धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली होती. संदीप पाटील हे उजव्या हाताने फलंदाज आणि मध्यमगती गोलंदाज होते. त्यांनी १५ जानेवारी १९८० रोजी पाकिस्तानविरुद्ध भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
संदीप पाटील ६ डिसेंबर १९८० रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. संदीप पाटील यांनी २९ कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांनी १,५८८ धावा केल्या आणि ९ विकेट्स देखील घेतल्या आहेत. यामध्ये ४ शतके आणि ७ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच वेळी, त्यांनी ४५ एकदिवसीय सामन्यांमध्ये १,००५ धावा फटकावल्या आहेत. यामध्ये त्यांनी १५ विकेट्स घेतल्या, तसेच ९ अर्धशतककं देखील झळकवले आहेत.
क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर संदीप पाटील यांनी क्रिकेटमध्ये नवीन इनिंग सुरु केली. ते निवृत्तीनंतर कोचिंगच्या जगात सक्रिय झाले होते. १४ नोव्हेंबर १९९६ रोजी पाटील केनियाचे प्रशिक्षक बनले होते. त्यांच्या प्रशिक्षणाखाली संघाने उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली होती. संघाने केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे पाटील यांचा कार्यकाळ २००३ मध्ये खेळवण्यात आलेल्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत वाढविण्यात आला होता. २००३ च्या विश्वचषकामध्ये देखील केनियाने संदीप पाटील यांच्या प्रशिक्षणाखाली शानदार कामगिरी केली होती.
हेही वाचा : मोहम्मद सिराजच्या गाडीच्या नंबरचं नातं जर्सीशी…व्हायरल फोटोने चर्चेला सुरुवात
दक्षिण आफ्रिकेमध्ये खेळवण्यात आलेल्या २००३ च्या एकदिवसीय विश्वचषकामध्ये केनियाने त्यांच्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आणि आतापर्यंतच्या क्रिकेट इतिहासातील एकमेव उपांत्य फेरीमध्ये त्यांनी धडक मारली होती. पाटील २७ सप्टेंबर २०१२ ते सप्टेंबर २०१६ पर्यंत बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष राहिले होते. त्याच काळात भारताने २०१३ चा चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले होते.