भारतीय क्रिकेट जगतात शोककळा; पदार्पणातच धमाका उडवणाऱ्या माजी अष्टपैलू क्रिकेटपटूचे निधन...(फोटो-सोशल मीडिया)
Syed Abid Ali Death : भारतीय संघ आणि त्याचे चाहते चॅम्पियन ट्रॉफीच्या विजयाचा आनंद साजरा करण्यात दंग असताना भारतीय क्रिकेट जगतातून एक वाईट बातमी समोर आली आहे. भारतीय संघाचे माजी अष्टपैलू खेळाडू सय्यद आबिद अली यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. या बातमीने सर्व क्रिकेटप्रेमींमध्ये शोककळा पसरली आहे. अदिब अली हे भारताच्या सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक मानले जात होते. त्यांनी भारतीय संघासाठी एकूण 29 कसोटी सामने खेळले आहेत. अली यांच्या निधनावर माजी क्रिकेटपटूंनी तीव्र शोक व्यक्त करण्यात आला आहे.
सुनील गावसक म्हणाले की, ही फार वाईट बातमी आहे. ते मोठ्या मनाचे क्रिकेटर होते. अली टीमच्या गरजेनुसार सर्वकाही करत असे. अली हे निर्णायक क्षणी मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंग करत असत. तसेच लेग साईड कॉर्डन येथे अविश्वसनीय अशा कॅचही घेतल्या आहेत. ज्यामुळे आमचा स्पिनचा मारा आणखी मजबूत होता, असे सांगत गावसकर यांनी श्रद्धांजली वाहिली.
माजी क्रिकेटर आबिद अली यांचा जन्म 9 सप्टेंबर 1941 रोजी हैदराबादमध्ये झाला. अली यांची वयाच्या 15 व्या वर्षी शाळेकडून क्रिकेट खेळण्यासाठी निवड करण्यात आली होती. अली यांनी फिल्डिंगने प्रभावित केलं होतं त्यामुळे निवड समितीने अली यांची निवड केली होती. तसेच अली यांची शालेय स्तरावर 3 वर्ष क्रिकेट खेळल्यानंतर हैदराबाद ज्युनिअर टीममध्ये निवड झाली होती. त्यानंतर दुसऱ्याच वर्षी अली यांची रणजी ट्रॉफी स्पर्धेसाठी निवड झाली होती.
अली यांनी आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघात प्रवेश केला होता. अली यांनी 1967 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केलं होतं. त्यांनी आपल्या पहिल्याच सामन्यामधील दोन्ही डावांत 33 धावा केल्या होत्या. तसेच त्यांनी 55 धावा देत 6 विकेट्सही मिळवल्या होत्या.
हेही वाचा : Virat kohli : विराटची विकेट जाताच तरुणीने घेतला अखेरचा श्वास; वडिलांकडून धक्कादायक माहिती समोर…
आबिद अली हे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू होते. त्यांनी 212 सामन्यांमध्ये 8,732 धावा केल्या, त्यापैकी बहुतेक रणजी ट्रॉफीमध्ये हैदराबादसाठी केल्या आहेत. त्यांनी प्रथम श्रेणीमध्ये 13 शतके आणि 31 अर्धशतके झळकावली आहेत. त्यांची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 173 ही होती. या 212 सामन्यांमध्ये आबिद अलीने 14 वेळा एका डावात पाच विकेट घेत 397 बळी घेतले आहेत. त्यांनी 12 लिस्ट ए सामन्यात 169 धावा केल्या तसेच 19 विकेट्स देखील घेतल्या आहेत.
आबिद अली यांनी 29 कसोटी सामन्यांमध्ये 20.36 च्या सरासरीने 1 हजार 18 धावा केल्या आहेत. यामध्ये 6 अर्धशतकं झळकावली आहेत. तसेच त्यांनी 42.12 च्या सरासरीने 47 विकेट्सही घेतल्या. तसेच अली यांनी 5 एकदिवसीय सामन्यांमध्ये 93 धावा करण्यासह 7 विकेट्सही मिळवल्या आहेत.