ईरानी कपच्या सामन्यात मैदानात जोरदार गदारोळ (Photo Credit - X)
Irani Cup 2025: विदर्भ आणि रेस्ट ऑफ इंडिया यांच्यात नागपूरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या ईरानी कप २०२५ च्या अंतिम सामन्यात मोठी हाणामारी होता होता वाचली. सामन्याच्या शेवटच्या दिवशी विदर्भाचा वेगवान गोलंदाज यश ठाकूर आणि रेस्ट ऑफ इंडियाचा फलंदाज यश धुल यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. ही परिस्थिती हाताळण्यासाठी पंचांना मध्यस्थी करावी लागली. रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली विदर्भ संघाने हा सामना ९३ धावांनी जिंकत तिसऱ्यांदा ईरानी कपचा किताब आपल्या नावावर केला.
विदर्भाने रेस्ट ऑफ इंडियासमोर विजयासाठी ३६१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना यश धुलने आपल्या खेळीने संघाला सामन्यात टिकवून ठेवले होते. ९२ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर असताना यश धुलने यश ठाकूरच्या चेंडूवर ऑफ स्टम्पच्या दिशेने हवेत एक फटका मारला, पण सीमारेषेवर अथर्व तायडेने त्याचा झेल टिपला.
pic.twitter.com/LwuqQrd4IA — Nihari Korma (@NihariVsKorma) October 5, 2025
धुलची विकेट मिळवताच यश ठाकूरने अति-आक्रमक पद्धतीने जल्लोष करायला सुरुवात केली. ठाकूरची ही कृती यश धुलला आवडली नाही आणि दोघांमध्ये मैदानातच जोरदार भांडण सुरू झाले. प्रकरण वाढताना पाहून विदर्भ संघाचे खेळाडू आणि पंचांना त्वरित मध्यस्थी करून हा वाद शांत करावा लागला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
दोन्ही खेळाडू ज्या पद्धतीने लाइव्ह मॅचमध्ये भिडले, ही बाब गंभीर मानली जात आहे. मॅच रेफरी पंकज धरमाणी या घटनेची गंभीर दखल घेऊन दोन्ही खेळाडूंवर मोठी कारवाई करू शकतात. बीसीसीआयलाही या दोन खेळाडूंवर कठोर ॲक्शन घ्यावी लागू शकते. आंतरराष्ट्रीय स्तरावर या भांडणाची सध्या खूप चर्चा आहे.
या सामन्यात विदर्भ संघाने रेस्ट ऑफ इंडियाचा दुसरा डाव २६७ धावांवर संपुष्टात आणत ९३ धावांनी दणदणीत विजय मिळवला. ही विदर्भ संघाची तिसऱ्यांदा ईरानी कप ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी आहे. सामन्यात यश ठाकूरच्या गोलंदाजीबद्दल बोलायचं झाल्यास, त्याने दोन्ही डावांत मिळून एकूण ६ बळी घेतले. पहिल्या डावात त्याने चार, तर दुसऱ्या डावात दोन विकेट्स मिळवत संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली.