पार्थिव पटेल(फोटो-सोशल मीडिया)
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील चार सामने खेळून झाले आहेत. यामध्ये इंग्लंडने २-१ अशी आघाडी घेतली असून एक सामना ड्रॉ झाला आहे. या मालिकेतील आगामी सामना ३१ जुलैपासून केनिंग्टन ओव्हलमध्ये खेळला जाणार आहे. भारताला पाचव्या सामन्यात विजय मिळवणं जास्त महत्वाचं आहे, अन्यथा भारताला मालिका गमवावी लागेल. अशातच माजी भारतीय यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेलने फिरकी गोलंदाज कुलदीप यादवबाबत मोठे विधान केले आहे. त्याने म्हटले आहे की, “ओव्हल येथे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाने कुलदीप यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट करण्याचा विचार करावा.”
भारत आपल्या गोलंदाजीच्या अष्टपैलू रणनीतीवर ठाम असलयाचे दिसते. अशा परिस्थितीत, इंग्लंडच्या या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील खेळून झालेल्या चार सामन्यांमध्ये कुलदीपला अद्याप प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले नाही. पाच सामन्यांच्या मालिकेत भारत अजून देखील २-१ ने पिछाडीवर आहे. भारताला मालिका २-२ ने बरोबरीत आणण्यासाठी आणि मालिका पराभव टाळण्यासाठी पाचवा कसोटी सामाना जिंकावा लागणार आहे.
हेही वाचा : WCL 2025 : भारत-पाकिस्तान सामना रद्द झाल्यास काय असेल पर्याय? जाणून घ्या कोणाला बसेल फटका?
पार्थिव पटेल ‘जियो हॉटस्टार’ वर बोलताना म्हणाला की, “भारताने अलिकडच्या काळात फलंदाजीत दाखवलेल्या आत्मविश्वासाने संघ निवडला हवा. जर बुमराह उपलब्ध असणार नसेल तर, भारताला आणखी एका आक्रमक गोलंदाजाची आवश्यकता असेल. कुलदीप यादव हा असाच आक्रमक गोलंदाज आहे ज्याच्याकडे विकेट घेण्याची क्षमता आहे.”
पार्थिव पटेल पुढे म्हणाला की, “भारताने निश्चितपणे त्याला अंतिम इलेव्हनमध्ये समाविष्ट करण्याचा विचार करावा. असे होईल की नाही हे सांगणे कठीण आहे, परंतु, मला वाटते की, कुलदीप यादवला निश्चितपणे खेळवायला हवे .” वृत्तांनुसार, वर्कलोड व्यवस्थापनामुळे जसप्रीत बुमराह पाचवी कसोटी खेळणार नाही. अशा परिस्थितीत, वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व मोहम्मद सिराज करणार आहे. सिराज हा एकमेव भारतीय वेगवान गोलंदाज आहे ज्याने या मालिकेत चारही कसोटी सामने खेळले आहेत.
माजी क्रिकेटपटू पटेल म्हणाला, “आम्ही मोहम्मद सिराजला गृहीत धरत असतो. सामन्याची परिस्थिती कशी देखील असली तरी तो करत असलेली मेहनत, तो दाखवत असलेला उत्साह आणि चेहऱ्यावर हास्य हे नक्कीच कौतुकास्पद असेच आहे. बुमराहच्या बाबतीत, त्याच्या वर्कलोडचे व्यवस्थापन किती काळजीपूर्वक केले जात आहे हे आपल्या सर्वांना माहितीच आहे.”
पटेल पुढे म्हणाला की, “पत्रकार परिषदेमध्ये आधीच जाहीर केले गेले होते की, बुमराह फक्त तीन कसोटी खेळणार आहे, त्यामुळे रिकव्हरी, फिटनेस, वर्कलोड अशा अनेक घटकांचा विचार करण्यात येतो. परंतु मला त्याला शेवटची कसोटी खेळताना पहायचे आहे. आशा आहे की संघासोबत प्रवास करणारा सपोर्ट स्टाफ त्याला वेळेत बरे होण्यास मदत करेल.”