केएल राहुल(फोटो-सोशल मीडिया)
IND Vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात एजबॅस्टन येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात, भारताने पहिल्या डावात ५८७ आणि दुसऱ्या डावात ४२७ धावा करून आपला डाव घोषित केला. या सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताचा सलामीवीर केएल राहुलने ८४ चेंडूत शानदार ५५ धावा केल्या. यासह, केएल राहुलने सलामीवीर म्हणून भारतासाठी ३००० धावांचा टप्पा गाठला आहे.
यासह केएल राहुल आता सुनील गावस्कर, वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर आणि मुरली विजय यांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. राहुल कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून ३००० धावांचा टप्पा ओलांडणारा पाचवा भारतीय फलंदाज बनला आहे. केएल राहुलला कसोटीत सलामीवीर म्हणून ३००० धावा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या डावात १६ धावांची आवश्यकता होती. त्याने बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन कसोटीत टप्पा पूर्ण केला. यापूर्वी, राहुलने पहिल्या कसोटी सामन्यात ४२ आणि १३७ धावा केल्या होत्या.
हेही वाचा : Ind and Eng 2nd Test : कप्तान शुभमन गिलच्या ‘नाईक व्हेस्ट’मुळे उडाला गोंधळ; BCCI ला बसणार मोठा फटका..
कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर फलंदाज म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा एकूण विक्रम इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कुकच्या नावावर जमा आहे. त्याच्या १२ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत त्याने सलामीवीर म्हणून २७८ डाव खेळले आहेत. यामध्ये त्याने ११,८४५ धावा केल्या आहेत. पाच दिवसांच्या क्रिकेट प्रकारात सलामीवीर म्हणून १०,००० पेक्षा जास्त धावा करणारा कुक हा जगातील एकमेव फलंदाज आहे.
केएल राहुलने इंग्लंडमध्ये इंग्लंड संघाविरुद्ध खेळलेल्या ११ कसोटी सामन्यांच्या २२ डावात ८५० धावा फटकावल्या आहेत. इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत भारताकडून राहुलपेक्षा जास्त धावा फक्त सचिन तेंडुलकर (१५७५), राहुल द्रविड (१३७६), सुनील गावस्कर (११५२), विराट कोहली (९७६), दिलीप वेंगसरकर (९६०), सौरव गांगुली (९१५) आणि गुंडप्पा विश्वनाथ (८५८) यांनी केलेल्या आहेत.






