केएल राहुल(फोटो-सोशल मीडिया)
KL Rahul’s great feat : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दूसरा सामना दिल्ली येथे आजपासून खेळला जात आहे. दरम्यान, भारतीय सलामीवीर केएल राहुलने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात एक मोठी कामगिरी केली आहे. केएल राहुल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये २००० पेक्षा जास्त धावा करणारा सातवा भारतीय फलंदाज बनला आहे. या कामगिरीच्या जोरावर त्याने विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या खास यादीत स्थान मिळवले आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामना दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात डावाची सुरवात करणारा भारतीय सलामीवीर केलएल राहुलला या सामन्यात २००० धावा पूर्ण करण्यासाठी १६ धावांची आवश्यकता होती. राहुलने भारताच्या पहिल्या डावाच्या नवव्या षटकाच्या शेवटच्या दोन चेंडूंवर जेडेन सील्सला सलग दोन चौकार मारून ही किमया साधली. त्याच्याकडे आता ३१ वर्ल्ड टेस्ट सामन्यांमध्ये २००३* धावा जमा आहेत.
हेही वाचा : IPL 2026 चे बिगुल वाजले! संघ कोणाला करणार रिटेन? वाचा सविस्तर
यष्टीरक्षक ऋषभ पंत दुखापतीमुळे या वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतून बाहेर आहे. त्याच्या जागी यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलला संघात स्थान देण्यात आले आहे. ऋषभ पंतने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा फटकावल्या आहेत. ऋषभ पंतने ३८ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन सामने खेळले आहेत आणि त्यात त्याने सहा शतके आणि १६ अर्धशतकांसह २,७३१ धावा केल्या आहेत. त्यानंतर या यादीत रोहित शर्मा २,७१६ धावांसह दुसऱ्या स्थानी आहे. रोहितने आता कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. शुभमन गिल २,६९७ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर असून विराट कोहली २,६१७ धावांसह चौथ्या क्रमांकावर विराजमान आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम इंग्लंडचा जो रूटच्या नावे जमा आहे. जगातील नंबर १ कसोटी फलंदाजाने आतापर्यंत खेळलेल्या ६९ सामन्यांमध्ये एकूण ६,०८० धावा फटकावल्या आहेत. त्याच्या जवळपासही दूसरा खेळाडू नाही. ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथने ४,२७८ धावा करून दुसऱ्या तर मार्नस लाबुशेन ४,२२५ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात केएल राहुल चांगला खेळताना दिसत होता. परंतु, तो ३८ धावांवर बाद झाला. त्याने ५४ चेंडूंचा सामना करत ३८ धावा केल्या. या खेळीदरम्यान राहुलने पाच चौकार आणि एक षटकार मारला. जमील वॉरिकनने राहुलला बाद करून वेस्ट इंडिजला पहिले यश मिळवून दिले आहे.