महेंद्रसिंग धोनी(फोटो-सोशल मिडिया)
KKR vs CSK : बुधवारी चेन्नईने कोलकाता नाईट रायडर्सवर दोन विकेट्सने विजय मिळवला. या विजयानंतर चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने कबूल केले की तो त्याच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात आला आहे. तथापि, धोनीने स्पष्ट केले की सध्या निवृत्तीचा त्याचा कोणताही विचार नाही, तसेच योग्य वेळ आल्यावरच तो यावर निर्णय घेईल असे देखील धोनीने म्हटले आहे.
या सामन्यात कोलकाताकडून कर्णधार अजिंक्य रहाणे (४८), आंद्रे रसेल (३८) आणि मनीष पांडे (नाबाद ३६) यांच्या खेळीमुळे नाईट रायडर्सने सहा बाद १७९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, सुपर किंग्जने ६० धावांत पाच विकेट गमावून देखील डेवाल्ड ब्रेव्हिसने २५ चेंडूत ५२ धावा केल्या. यामध्ये चार षटकार आणि चार चौकार लगावले. त्याच्या अर्धशतकाच्या मदतीने आणि शिवम दुबे (४५ धावा, ४० चेंडू, तीन षटकार, दोन चौकार) खेळीच्या मदतीने १९.४ षटकांत आठ विकेट गमावून १८३ धावा करून सामना आपल्या खिशात टकळा होता.
या विजयामुळे सुपर किंग्जने चार सामन्यांच्या पराभवाची मालिका खंडित केली आहे. त्यानंतर धोनीने चाहत्यांच्या पाठिंब्याचे कौतुक करत चालू हंगामाच्या शेवटी निवृत्ती घेण्याचा त्याचा कोणताही हेतू नसल्याचा इशारा दिला आहे.
सामन्यानंतर धोनी बोलला की, ‘हे प्रेम आणि आपुलकी आहे जे मला नेहमीच मिळत आले आहे. मी ४२ वर्षांचा आहे हे विसरू नका. मी बराच काळ खेळलो आहे. त्यांच्यापैकी अनेकांना माहित नाही की माझा शेवटचा सामना कधी होईल (हसत) म्हणून ते येऊन मला खेळताना पाहू इच्छितात.” असे धोनीने सांगितले.
तसेच तो पुढे म्हणाला, “मी माझ्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहे हे सत्य नाकारता येत नाही. आयपीएल संपल्यानंतर, मला सहा ते आठ महिने खूप मेहनत करावी लागेल आणि माझे शरीर या दबावाचा सामना करू शकते की नाही ते पहावे लागणार आहे. सध्या काहीही निश्चित झालेले नाही परंतु मी पाहिलेले प्रेम आणि आपुलकी आश्चर्यकारक असेच आहे.”
हेही वाचा : Bharat pak war : भारतीय ड्रोन हल्ल्यात Rawalpindi Cricket Stadium नेस्तनाबूत! PSL खेळाडूचा जीव टांगणीला..
महेंद्रसिंग धोनीने केकेआर विरुद्ध खेळताना एक अद्भुत कामगिरी करून दाखवली आहे. तो आता आयपीएलच्या इतिहासात १०० सामन्यात नाबाद राहणारा पहिला खेळाडू ठरला आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीत अद्भुत खेळ दाखवला आहे, ज्यामुळे त्याचे चाहते अजून देखील त्याला खेळताना पाहू इच्छित आहेत.