रोहित शर्मा(फोटो-सोशल मीडिया)
Rohit Sharma Test retirement : भारताचा दिग्गज कर्णधार रोहित शर्माने ७ मे रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. या घोषणेने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्याच्या निर्णयामुळे त्याचे चाहते खूप निराश झाल्याचे दिसत आहे. कारण सर्वांना वाटत होते की तो इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत भाग घेईल परंतु या मालिकेपूर्वी त्याने आपली निवृत्ती जाहीर करून सर्वांना धक्का दिला. यावेळी रोहित शर्माने केवळ कसोटी कर्णधारपद सोडले नसून संपूर्ण कसोटी क्रिकेटलाच अलविदा म्हटले आहे. सध्या हा महान भारतीय क्रिकेटपटू कसोटी क्रिकेटपासून दूर गेला आहे. या बातमीनंतर चाहत्यांना वाटत आहे की, रोहित शर्मा लवकरच एकदिवसीय क्रिकेटमधूनही निवृत्तीची घोषणा करण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : Bharat pak war : भारतीय ड्रोन हल्ल्यात Rawalpindi Cricket Stadium नेस्तनाबूत! PSL खेळाडूचा जीव टांगणीला..
रोहित शर्मा एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होणार का असे प्रश्न चाहत्यांना पडत आहेत. याबाबत रोहित शर्माचे बालपणीचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी चाहत्यांच्या या प्रश्नांना उत्तर दिले आहे. त्यांनी सांगितले की, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला २०२७ चा एकदिवसीय विश्वचषक जिंकायचा आहे. एक उल्लेखनीय आहे की, भारतीय संघाने गेल्या वर्षी २०२४ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टी-२० विश्वचषक जिंकला होता. यानंतर, २०२५ च्या सुरुवातीला, टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी देखील आपल्या नावे केली आहे. आता, रोहितच्या बालपणीच्या प्रशिक्षकांनी असा दावा केला आहे की, २०२७ मध्येही रोहित शर्मा विजयी कर्णधार असणार आहे.
रोहितचे प्रशिक्षक लाड यांना पुढे असे देखील विचारण्यात आले की, रोहित शर्मा या वर्षी होणाऱ्या इंग्लंड मालिकेसाठी आत्मविश्वासू आहे की नाही? याला उत्तर देत असताना ते म्हणाले की, या निर्णयाचा इंग्लंडसोबतच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेशी काही देखील संबंध नाही. रोहित शर्मा हा पुढच्या पिढीला संधी देऊ इच्छित आहे. गेल्या वर्षीच्या टी-२० विश्वचषकानंतर त्याने तसे सांगितले होते.
बीसीसीआयकडून एक व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये रोहित शर्माच्या कसोटी कारकिर्दीतील काही डाव दाखवण्यात आले आहेत. यामध्ये रोहित म्हणत आहे की, तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करणे ही स्वतःच अभिमानाची अशी गोष्ट आहे. आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी देखील इंस्टाग्रामवर पोस्ट करून रोहितचे निवृत्तीबद्दल अभिनंदन केले आहे. याशिवाय बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी राजीव शुक्ला यांनी देखील हिटमॅनला शुभेच्छा दिल्या आहेत.