फोटो सौजन्य - KolkataKnightRiders सोशल मीडिया
KKR vs SRH Pitch Report : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये आयपीएल २०२५ चा १५ वा सामना आज म्हणजेच गुरुवार, ३ एप्रिल रोजी कोलकात्यातील ईडन गार्डन्स मैदानावर खेळवला जाणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ शेवटचा सामना २०२४ चा फायनलचा सामना खेळले होते. यामध्ये कोलकाता नाईट राइडर्सने आयपीएल २०२४ चे जेतेपद नावावर केले होते. शेवटचा सामना गमावल्यानंतर दोन्ही संघ येथे पोहोचले आहेत, त्यामुळे ते विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करतील. कोलकाता आपल्या घरच्या मैदानावर हा दुसरा सामना खेळणार आहे, हंगामाच्या सुरुवातीच्या सामन्यात त्यांना आरसीबीकडून पराभव पत्करावा लागला होता.
आज केकेआर घरच्या मैदानावर पहिला सामना जिंकेल अशी अपेक्षा आहे. आयपीएल २०२५ च्या पॉइंट्स टेबलमध्ये दोन्ही संघ तळाच्या ३ मध्ये आहेत. चला ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीच्या अहवालावर एक नजर टाकूया-
आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत ईडन गार्डन्सवर फक्त एकच सामना खेळला गेला आहे, जिथे आरसीबीने १६ षटकांत १७५ धावांचा पाठलाग केला. तथापि, आजच्या सामन्यात खेळपट्टी थोडी संथ असण्याची अपेक्षा आहे ज्यामुळे फिरकीपटूंना फायदा होऊ शकतो आणि फलंदाजांना अडचणी येऊ शकतात. गेल्या हंगामात पाहिले तर, लक्ष्याचा पाठलाग करणारे संघ अधिक यशस्वी झाले, प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाने सहा पैकी चार सामने जिंकले आणि प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकलेल्या दोन सामन्यांमध्ये विजयाचे अंतर ४ आणि १ धावांचे होते. अशा परिस्थितीत, नाणेफेक जिंकल्यानंतर, संघ आज देखील प्रथम गोलंदाजी करण्यास प्राधान्य देतील.
ईडन गार्डन्सच्या मैदानावर आज सामना खेळवला जाणार आहे, या मैदानावर आयपीएलचे ९४ सामने झाले आहेत. आयपीएलचा रेकॉर्ड आणि आकडेवारीवर नजर टाकली तर या मैदानावर प्रथम फलंदाजी करताना जिंकलेले सामने ३८ आहेत तर लक्ष्याचा पाठलाग करताना जिंकलेले सामने या मैदानावर ५६ आहेत. नाणेफेक जिंकून जिंकलेले सामने या मैदानावर ५० आहेत. नाणेफेक गमावल्यानंतर जिंकलेले सामने ४४ आहेत. या मैदानावर सर्वाच्च धावसंख्या २६२/२ अशी आहे. सर्वात कमी धावसंख्या ४९ आहे. प्रथम फलंदाजी करताना सरासरी धावसंख्या १६२.९० इतकी आहे.
Target engaged 🎯
Ishan Kishan | #PlayWithFire | #KKRvSRH | #TATAIPL2025 pic.twitter.com/q4AdsrASmx
— SunRisers Hyderabad (@SunRisers) April 3, 2025
आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात एकूण २८ सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये केकेआरने १९ सामने जिंकून वर्चस्व गाजवले आहे, तर एसआरएचने या काळात फक्त ९ सामने जिंकले आहेत. अशा परिस्थितीत, आज कोलकाता वरचढ ठरणार आहे.आजचा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा असणार आहे. कोलकाता नाईट राइडर्सला आधीच्या सामन्यात वानखेडेवर मुंबई इंडियन्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता तर हैदराबादच्या संघाला दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता.