केएल राहुल(फोटो-सोशल मीडिया)
IPL 2025 : आयपीएल २०२५ चा 18 वा हंगामात चांगलाच बहरात आला आहे. आतापर्यंत ४० सामने खेळवण्यात आले आहेत. काल ४० वा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने एलएसजीचा ८ विकेट्सने पराभव केला. या विजयासह भारतीय संघाचा स्टार फलंदाज आणि विकेटकीपर केएल राहुलने आयपीएलमध्ये विशेष कामगिरी केली. केएल राहुल आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद ५००० धावा एकमेव खेळाडू बनला आहे. त्याने त्याच्या माजी संघ असलेल्या लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध हा पराक्रम करून दाखवला आहे.
केएल राहुलला ५००० धावा पूर्ण करण्यासाठी ५१ धावांची आवश्यकता होती. अशावेळी बंगळुरूच्या या ३२ वर्षीय फलंदाजाने लखनौच्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध ५७ धावांची शानदार खेळी साकारली आणि आयपीएलमध्ये इतिहास रचला.
हेही वाचा : रिषभ पंत आणि जहीर खानमध्ये चालू सामन्यात बाचाबाची, LSG डगआउटमधील व्हिडिओने उडवली खळबळ
गेल्या वर्षी आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात १४ कोटी रुपयांना डीसीने राहुलला सामील करून घेतले होते. त्याने १३९ व्या आयपीएल सामन्याच्या १३० व्या डावात ५००० धावांचा टप्पा पार केला. त्याने माजी ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचा विक्रम मोडीत काढला आहे. आयपीएलमध्ये खेळताना वॉर्नरने १३५ व्या डावात ५००० धावांचा डोंगर सर केला होता.
मंगळवारी एलएसजीविरुद्धच्या त्याच्या खेळीदरम्यान, केएल राहुलने रॉबिन उथप्पा (४९५२) आणि ख्रिस गेल (४९६५) यांना मागे टाकत आयपीएलच्या इतिहासात आठवा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला. विराट कोहली हा २६० सामन्यांमध्ये ८३२६ धावांसह आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याच्यानंतर रोहित शर्मा, शिखर धवन, डेव्हिड वॉर्नर, सुरेश रैना, एमएस धोनी आणि एबी डिव्हिलियर्स यांचा क्रमांक लागतो.
हेही वाचा : IPL 2025 : आधीच जखमी, तरी Prasidhhi Krishna चे दमदार पुनरागमन, विरोधी संघाला एकामागून एक देतोय डंख..
केएल राहुलने २०१३ च्या हंगामात आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. गेल्या १२ वर्षांत तो पाच वेगवेगळ्या संघांकडून खेळला आहे. त्याने पंजाब किंग्जसाठी सर्वाधिक धावा देखील केल्या आहेत. केएल राहुलने पंजाब किंग्जकडून खेळताना २५४८ धावा केल्या आहेत. केएल राहुल २०१८ ते २०२१ या काळात पंजाब किंग्जचा भाग होता. त्यानंतर तो लखनऊ सुपर जायंट्समध्ये सामील झाला. २०२२ ते २०२४ पर्यंत त्याने लखनऊ संघाची धुरा वाहिली.