आयुष म्हात्रे(फोटो-सोशल मीडिया)
IPL 2025 : आयपीएल २०२५ चा १८ हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघाची सुरवात चांगली झाली होती. त्यांनी मुंबई इन्डियनसला पराभूत करत आयपीएल २०२५ मध्ये झोकात सुरवात केली होती. मात्र त्यांतर चेन्नईच्या संघाचा आलेख घसरतच गेला. त्यांनी सलग ५ सामने गमावले आहेत. त्यातच चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे या हंगामातून बाहेर पडला आहे. आता एक बातमी समोर आली आहे की, चेन्नई संघ ऋतुराजच्या जागी मुंबईच्या १७ वर्षीय फलंदाजाचा समावेश करणार आहे.
सीएसके संघ व्यवस्थापनाच्या जवळच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, आयुष म्हात्रे हा फलंदाज काही दिवसांत चेन्नई सुपर किंग्ज संघात सामील होणार आहे. शनिवारी रात्री हा निर्णय घेण्यात आला आहे. क्रिकबझच्या मते, आयुषला ताबडतोब चेन्नई सुपर किंग्जमध्ये सामील होण्यास सांगण्यात आले आहे. पण तो दोन दिवसांनी एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईच्या संघात सामील होण्याची शक्यता आहे. मेगा लिलावात म्हात्रे यांना कोणत्याही संघाकडून खरेदी करण्यात आले नव्हते. आता तो ३० लाख रुपयांच्या बेस प्राईसवर या संघात सामील होणार आहे.
चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून अलिकडेच आयुष म्हात्रेला चाचणीसाठी बोलवण्यात आले होते. म्हात्रे यांच्याव्यतिरिक्त, गुजरातमधील उर्विल पटेल आणि उत्तर प्रदेशमधील सलमान निजार यांना देखील बोलावण्यात आले होते. पण आयुष म्हात्रेने व्यवस्थापनाला प्रभावित करण्यात यश मिळवले आहे. ऋतुराज गायकवाडच्या दुखापतीनंतर पृथ्वी शॉचे नाव देखील चर्चेत होते. पण, चेन्नई सुपर किंग्जने शॉमध्ये रस न दाखवता व्यवस्थापनाकडून आयुष म्हात्रेचा संघात समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला.
आयुष म्हात्रे रणजी करंडकाच्या या हंगामात मुंबईसाठी सर्वाधिक धावा करणारा चौथा फलंदाज ठरला आहे . म्हात्रेने ८ सामन्यांमध्ये २ शतकांच्या मदतीने ४७१ धावा केल्या आहेत. याशिवाय, विजय हजारे ट्रॉफीमध्ये सौराष्ट्रविरुद्ध शतक झळकावून म्हात्रे याने सामना जिंकून दिला होता. विजय हजारे ट्रॉफीमध्ये तो मुंबईसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. विजय हजारे ट्रॉफीमध्ये म्हात्रेने ६४.४२ च्या सरासरीने ४५८ धावा चोपल्या होत्या.
गुरुवारी (१० एप्रिल) कोपराच्या दुखापतीमुळे चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज आयपीएल २०२५ च्या उर्वरित सामन्यांमधून बाहेर पडला आहे. ३० मार्च रोजी गुवाहाटी येथे राजस्थान रॉयल्स विरुद्ध सीएसकेकडून खेळत असताना त्याला दुखापत झाली होती. त्याच्या अनुपस्थितीत, एमएस धोनीकडे चेन्नई सुपर किंग्जची धुरा आली आहे.