फोटो सौजन्य - Mumbai Indians सोशल मीडिया
Mumbai Indians vs Gujarat Giants : महिला प्रीमियर लीग आता शेवटच्या टप्प्यात आहे. काल WPL २०२५ चा प्लेऑफचा सामना पार पडला. यामध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स यांच्यामध्ये सामना रंगला होता. या सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा महिला प्रीमियर लीगच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. मुंबईकडून सायव्हर-ब्रंट (७७) आणि हेली मॅथ्यूज (७७) यांनी आक्रमक अर्धशतके झळकावली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ७१ चेंडूत १३३ धावांची भागीदारी केली. यामुळे मुंबई इंडियन्सने एलिमिनेटर सामन्यात गुजरात जायंट्सचा ४७ धावांनी पराभव केला आणि अंतिम फेरीचे तिकीट पक्के केले.
फलंदाजीनंतर मॅथ्यूज आणि सायव्हर-ब्रंट यांनी चेंडूनेही उत्कृष्ट कामगिरी केली आणि अनुक्रमे तीन आणि एक बळी घेतला. WPL च्या पहिल्या हंगामातील विजेत्या मुंबई इंडियन्सची लढत १५ मार्च रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सशी लढणार आहेत. ४ विकेटच्या मोबदल्यात २१३ धावांचा मोठा डोंगर उभारल्यानंतर, मुंबईने गुजरातला १९.४ षटकांत १६६ धावांवर रोखले आणि या संघाविरुद्ध सात सामन्यांतील त्यांचा सातवा विजय नोंदवला. गुजरातकडून डॅनियल गिब्सनने ३४, फोबी लिचफिल्डने ३१ आणि भारती फूलमाळीने ३० धावांचे योगदान दिले. मॅथ्यूज आणि सिव्हर ब्रंट व्यतिरिक्त, अमेलिया केरनेही मुंबईकडून दोन विकेट घेतल्या, शबनम इस्माईलला देखील यश मिळाले.
सायव्हर-ब्रंट आणि मॅथ्यूज यांनी पॉवरप्लेमध्ये सावधगिरीने फलंदाजी केली आणि नंतर मैदानाच्या सर्व भागात सहजतेने चौकार आणि षटकार मारले. सायव्हर-ब्रंटने ४१ चेंडूत ७७ धावांची खेळी केली. मॅथ्यूजनेही ५० चेंडूत ७७ धावांचे योगदान दिले. कर्णधार हरमनप्रीत कौरने १२ चेंडूत दोन चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ३६ धावा केल्या आणि संघाचा धावसंख्या २०० च्या पुढे नेली. लक्ष्याचा बचाव करताना शबनम इस्माईलने पहिल्याच षटकात बेथ मुनी (सहा) ला बाद करून गुजरातला मोठा धक्का दिला. डॅनियल गिब्सनने सईका इशाकविरुद्ध दोन चौकार मारून आत्मविश्वास दाखवला पण संस्कृती गुप्ताच्या शानदार थ्रोने हरलीन देओल (आठ) धावबाद झाली.
7⃣-0⃣, our record versus the Giants remains intact 😎#AaliRe #MumbaiIndians #TATAWPL #MIvGG pic.twitter.com/nkHUrE7d8x
— Mumbai Indians (@mipaltan) March 13, 2025
कर्णधार अॅशले गार्डनरने मॅथ्यूजच्या गोलंदाजीवर षटकार मारून आपले खाते उघडले पण वेस्ट इंडिजच्या अष्टपैलू खेळाडूने तिला बाद करून संघाला मोठी प्रगती मिळवून दिली. गिब्सनने हरमनप्रीतच्या चेंडूवर षटकार मारला तर लिचफिल्डने अमेलिया केरच्या चेंडूवर षटकार मारून आवश्यक धावगती कमी करण्याचा प्रयत्न केला पण गिब्सन दहाव्या षटकात धावबाद झाला . संघाने ११ व्या षटकात धावांचे शतक पूर्ण केले. आवश्यक रेट प्रति षटक १३ पर्यंत पोहोचल्यानंतर, लिचफिल्डने क्रीजमधून बाहेर येऊन केरविरुद्ध मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला परंतु तानिया भाटियाने त्याला यष्टीचीत केले. अमनजोत कौरविरुद्ध षटकार मारणाऱ्या भारतीशी झालेल्या चुकीच्या संवादामुळे काशवी गौतम (चार) धावबाद झाली.